विज्ञानविश्‍व: शंभर वर्षांपूर्वीचे ग्रहण

डॉ. मेघश्री दळवी

एखादे सूर्यग्रहण जवळ आले की शास्त्रीय प्रयोगांना एक पर्वणी असते. चंद्राच्या छायेने सूर्य झाकोळून टाकला की अवकाशातल्या इतर काही गोष्टींचे नीट निरीक्षण करता येते. त्यामुळे खग्रास सूर्यग्रहण असले की त्यावेळी करायच्या प्रयोगांची तयारी वर्ष-दोन वर्षं आधीपासून सुरू असते.

आजची गोष्ट आहे ती शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या एका अनन्यसाधारण महत्त्वाच्या सूर्यग्रहणाची. आइनस्टाइनने 1916 मध्ये सामान्य सापेक्षता सिद्धांत (जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) मांडला होता. गुरुत्वाकर्षण प्रकाशाला वाकवू शकते, असे त्यातले एक तत्त्व शास्त्रज्ञांना गोंधळवून टाकणारे होते. तोवर प्रभाव होता तो न्यूटनच्या सिद्धांताचा आणि त्यानुसार प्रकाशकिरणे नेहमीच सरळ रेषेत प्रवास करतात हा सर्वमान्य समज होता.

आइनस्टाइनचा नवा सिद्धांत काही कोड्यांची उकल करत होता तर काही प्रस्थापित तत्त्वांना आव्हान देत होता. बरं प्रयोग करून पाहायचा म्हटला, तर प्रकाशाला वाकवू शकेल इतके गुरुत्वाकर्षण निर्माण कसे करायचे, हा प्रश्‍न होताच. सर फ्रॅंक डायसन हे त्यावेळचे नामांकित ब्रिटिश शास्त्रज्ञ. त्यांनी सुचवले की 1919 मध्ये खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही संधी साधून सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्‍ती अवकाशात प्रवास करणाऱ्या प्रकाशाला वाकवू शकते का, हे आपण तपासून पहायचे.

कल्पना अफाट होती. पूर्ण अवकाश ही डायसन यांची प्रयोगशाळा होणार होती आणि प्रत्यक्ष सूर्य या प्रयोगात सक्रिय सहभाग घेणार होता. विचार करा शंभर वर्षांपूर्वी ही कल्पना काय चित्ताकर्षक वाटली असेल!

प्रकाश जर सरळ रेषेत प्रवास करत असेल, तर ग्रहणाच्या वेळी सूर्याच्या आड जे तारे असतील, ते आपल्याला दिसू शकणार नाहीत. मात्र जर प्रकाश सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने वाकत असेल, तर या सूर्याआडच्या ताऱ्यांचा प्रकाश वाकून आपल्यापर्यंत पोहोचू शकेल आणि आपल्याला ते तारे दिसू शकतील. त्यावेळी नेमका हायडेस तारकासमूह सूर्याच्या मागे असणार होता. तेव्हा हायडेसमधले तारे दिसू शकले तर आइनस्टाइन बरोबर आणि नाही दिसले तर न्यूटनचे सिद्धांत प्रखर गुरुत्वाकर्षणातही टिकणार. वरवर सोपा वाटणारा हा प्रयोगाचा आराखडा. मात्र त्याची तयारी करायला शास्त्रज्ञांना हातातली दोन वर्षे देखील कमी वाटत होती.

ग्रहणाचा दिवस आला, 29 मे 1919. बरोबर शंभर वर्षे आधीचा. सर फ्रॅंक डायसन आणि सर आर्थर एडिन्ग्टन हे आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यालगतच्या प्रिन्सिपी बेटावर जय्यत तयारीत होते. दुसऱ्या गटात अँड्‌य्ररू क्रॉमलिन आणि चार्ल्स डेव्हिडसन दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलच्या सोब्राल गावात दुर्बिणी घेऊन सज्ज होते. एडिन्ग्टनने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हायडेसमधल्या ताऱ्यांची जागा व्यवस्थित नोंदून ठेवली होती. सुमारे सात मिनिटे सुरू असलेल्या खग्रास ग्रहणात दोन्ही गटांनी भरपूर छायाचित्रे आणि निरीक्षणे घेतली. इंग्लंडला परत आल्यावर या संशोधकांनी पूर्ण विश्‍लेषण करून नोव्हेंबरमध्ये जाहीर केले- हो, ग्रहणात सूर्याआडचे हायडेसमधले तारे दिसू शकले. याचाच अर्थ गुरुत्वाकर्षणाने प्रकाश वाकतो आणि आइनस्टाइनचा सिद्धांत अचूक आहे! शंभर वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक ग्रहणाची म्हणून आज खास आठवण!

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×