पूर्व हवेलीत अतिवृष्टीमुळे 500 एकर क्षेत्र बाधीत

महसूल विभागाकडून पिकांचे पंचनामे सुरू

सोरतापवाडी – गेल्या आठवड्यापासून मुसळधार बरसत असलेल्या पावसामुळे पूर्व हवेली तालुक्‍यातील 500 एकर शेती बाधीत झाली आहे. यात खरीप हंगामातील पिकांचे आणि फुलशेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा हा एक कोटींवर जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्‍त होत आहे. महसूल विभागाकडून बाधीत पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. पंचनाम्यानंतर आता शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, प्रयाग धाम, तरडे आदी गावांतील शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी तातडीने दखल घेऊन प्रत्येक गावांत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गावकामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस पाटील, कृषी मित्र यांच्या मदतीने पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. या सर्व गावांत बाजरी, ऊस, भुईमूग, पालक, शेपू व फुलशेतीचे नुकसान झाले आहे. बाधित पिकांचे पंचनामे करून लवकरच सर्व अहवाल तहसीलदार कोळी यांना सादर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोरतापवाडी, नायगाव, पेठ येथील पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, तलाठी गवारी, ग्रामसेवक व कृषीमित्र सुधीर शितोळे व ग्रामस्थांनी मदत केली असल्याचे कृषी अधिकारी महेश सुरवडकर यांनी सांगितले.

पूर्व हवेलीतील अनेक गावांना पावसाचा फटका बसला आहे. शासनाकडून पंचनामे सुरू असले तरी तुटपुंजी रकमेवरच बोळवण केली जाणार काय, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील 400 शेतकरी बाधित झाले आहेत. सोरतापवाडीत 250 शेतकऱ्यांची 100 हेक्‍टर शेती बाधित झाली आहे.

पेठ येथील 70 शेतकऱ्यांची 40 हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. कोरेगाव मूळ येथील 90 शेतकऱ्यांना 70 हेक्‍टरवर पावसाचा फटका बसला आहे. नायगाव येथील 8 शेतकरी बाधीत आहेत. प्रयाग धाम येथील 5 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पंचनामे करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. बाधीत क्षेत्र जादा आहे. महसूल विभागाकडून पंचनामे सुरू आहे. त्यामुळे एकूण आकडेवारी उपलब्ध झाली नाही.

दोनशे एकर फूलशेतीला फटका
पूर्व हवेली तालुक्‍यात फुलशेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे पाचशे एकरांवर फुलशेती आहे. यशवंत साखर कारखान्याची अधोगती आणि उसाला हक्‍काचा कारखाना नसल्यामुळे शहरालगत असलेल्या अनेक गावांत शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यात यंदाच्या पावसाळ्यात अति पावसाने दोनशे एकर फुलशेती बाधीत झाली आहे. पूर्व हवेली तालुक्‍यातील फुलांना देशभरात मागणी आहे. नवीन तंत्रज्ञान आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी फुलशेती जीवापाड जपली होती. मात्र, पावसाने या फुलशेतीची हिरवळ कोमेजून गेली आहे. त्यामुळे फुलशेतीच्या नुकसानीचा आकडा हा सुमारे एक कोटींवर जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.