बीजिंग – चीनच्या उत्तरेकडील हबेई प्रांतातील तांगशान शहराला आज सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाचे हादरे राजधानी बीजिंगसह जवळपासच्या अन्य काही भागातही जाणवले, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सकाळी 6.38 मिनिटांनी ग्यु जिल्ह्यात झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरेकडे 39.78 अक्षांशांवर आणि पूर्वेला 118.4 रेखांशांवर होता, असे चीनच्या “चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर’ने म्हटले आहे. केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटरवर होता, या भूकंपाची तीव्रता 5.1 इतकी नोंदली गेली.
या भूकंपचा दुसरा धक्का याच जिल्ह्याला सकाळी 7.02 वाजता झाला आणि तो 2.2 इतक्या तीव्रतेचा होता. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपानंतर ग्यु जिल्ह्यामध्ये बचाव पथके तैनात केली गेली. भूकंपानंतर रेल्वेतून सर्व प्रवाशांना आपत्कालिन मार्गाने उतरवण्यात आले. तसेच रेल्वेच्या मार्गांची कसून तपासणी केली जात आहे.
तांगशान येथे 1976 मध्ये 7.8-तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता आणि त्यात 2, 40,000 पेक्षा जास्त लोक ठार झाले होते.