पुणे – “सामान्य कुटुंबांतील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी राज्यातील विद्यापीठांत सुरू असलेली “कमवा व शिका’ ही योजना अधिक व्यापक व नव्या स्वरुपात राबविण्याचा विचार आहे. त्याबाबतचा निर्णय उन्हाळी अधिवेशनात घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 119 वा पदवीदान कार्यक्रम सोमवारी पार पडला. त्यावेळी सामंत बोलत होते. ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत पिटर ट्रसवेल, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. महेश काकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व अधिष्ठाता आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, “पुणे विद्यापीठाने कुवेतमध्ये शैक्षणिक केंद्र सुरू करणे अभिमानास्पद आहे. पुण्याला शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र करण्यासाठी सर्व सहकार्य सहकार्य केले जाईल. विद्यापीठाने लोकप्रतिनिधींशी सुसंवाद निर्माण केल्यास विद्यापीठाला जिल्हा नियोजन समिती, आमदार निधीतून निधी प्राप्त करता येऊ शकतो. राज्य शासन आणि विद्यापीठाने एका गतीने चालत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत. पुण्यात प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय, तर बारामतीमध्ये उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी यशदासह सामंजस्य करार केला जाणार आहे.
ट्रसवेल म्हणाले, “जग सध्या अनिश्चिततेच्या काळातून जात असले, तरी नवसंकल्पनांच्या माध्यमातून वेगाने बदलणाऱ्या जगात अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थी बदलत्या काळानुसार शिक्षण घेत जगासाठी आपले योगदान देतील याची मला खात्री वाटते.’
पदवीप्रदान समारंभही मराठी भाषेतच घ्यावा
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. त्यामुळे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभही मराठी भाषेतून घेण्याची सूचना सामंत यांनी विद्यापीठाला केली.