नवी दिल्ली : तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना अचानक अटक करण्यात आली आहे. एन. चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक करण्यात आली. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे.
आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीने अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. चंद्राबाबू नायडू यांना 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. ईडीच्या तपासात हा घोटाळा सिद्ध झाला आहे. 241 कोटी रुपयांचा निधी शेल कंपन्यांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी 8 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
Andhra Pradesh | Criminal Investigation Department (CID) arrest TDP chief and former Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu in Nandyala: TDP
(File Pic) pic.twitter.com/m6cWcONAVa
— ANI (@ANI) September 9, 2023
भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने नायडू यांच्यावर शनिवारी सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदयाल शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे 3 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. त्याला अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नंदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा नांदयाल येथील आरके फंक्शन हॉल परिसरात दाखल झाला होता.
चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नंदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले, परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला चंद्राबाबूंना अटक करू दिली नाही. मात्र पोलिसांशी चर्चा केल्यानंतर चंद्रबाबू यांनी त्यांना सहकार्य केले आणि त्यांनंतर त्यांना अटक करण्यात आली.
दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा आणि टीडीपी नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. टीडीपीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोकेशचा व्हिडीओ देखील जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, ते (लोकेश) चंद्राबाबू नायडूंना भेटू शकत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान,एपी डीआयजींनी त्यांना कौशल्य विकास घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी, आंध्र प्रदेशचे मंत्री आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दावा केला होता की टीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्र्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा दावा केला होता.