पुणे -गणेशोत्सवाच्या काळातील मंडप आणि कमानींवर लावण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी महापालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल. 50 मीटर रनिंग मंडपापर्यंत ते माफ असेल, तसेच उत्सवकाळात चारशे मोबाइल टॉयलेट उभारण्यात येतील. याशिवाय उत्सव पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या भक्तांच्या वाहनांना पार्किंग करणे सोईचे जावे यासाठी महापालिका शाळांची मैदाने आणि शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाचे (सीओईपी) मैदान उपलब्ध करून देण्याची घोषणा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी केली.
महापालिकेच्या वतीने शहरातील गणेशोत्सव मंडळांची शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आयुक्त विक्रम कुमार यांनी ही घोषणा केली. यावेळी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, झोन वन उपायुक्त संदीपसिंह गिल, महापालिका उपायुक्त महेश पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख माधव जगताप उपस्थित होते.
गेल्या दिवसांमध्ये शहरात उघडकीस आलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ठरवण्यात येत असतो. तसेच अन्य भागांतील सीसीटीव्ही तपासणी पोलिसांच्या मदतीने करण्यात येईल. जे बंद आहेत. ते सुरू करण्यात येतील. तसेच जे नादुरूस्त आहेत, ते बदलण्यात येतील. आपल्याकडे उत्सवासाठी भरपूर निधी उपलब्ध आहे, असे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.
मोबाइल टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी चोवीस तास स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. तसेच मार्गावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पथके नेमण्यात येतील. सन 2022 मध्ये परवाने दिलेल्या मंडळांना सन 2026 पर्यंत कोणतीही परवानगी घेण्यासाठी मंडळांना महापालिकेकडे येण्याची गरज नाही, असे आयुक्त म्हणाले.
प्रमुख मंडळांची बैठकीकडे पाठ
या बैठकीकडे मानाचे गणपती आणि अनेक मंडळांनी पाठ फिरवली. याबाबत आयुक्तांनी विचारले. “दरवर्षी उत्सवाच्या आधी दोन महिने महापालिका बैठक घेते. यंदा प्रथमच उत्सवाला 11 दिवस राहिले असताना बैठक बोलवली,’ असे कारण खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आबा बालगुडे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्याने महापालिकेची बैठक पुढे ढकलली. पुढील वर्षी याबाबत काळजी घेण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.
मंडळांनी केलेल्या अन्य मागण्या
- विसर्जन मार्गावरील पदपथ दुरुस्ती करून घ्यावी.
- निर्माल्य कलश नदीपात्रासह रस्त्यावरही ठेवावीत.
- कमानी अथवा मंडपावरील जाहिरातींसाठी शुल्क आकारू नये.
- पुरेशी टॉयलेटची व्यवस्था करावी.
- स्वागत कक्षांना रस्त्यांमध्ये परवानगी देऊ नये.
- विसर्जन मार्गावरील ड्रेनेजची चेंबर आणि जाळ्या सुस्थितीत कराव्यात.
- उत्सव काळात मेट्रो उशिरापर्यंत सुरू ठेवावी.
- पार्किंगसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- मेट्रोच्या कामाचे बॅरीकेडिंग कमी करावे.
महापालिकेने दिलेले आश्वासन
- कोणत्याही परवान्यासाठी महापालिकेकडे येण्याची गरज नाही.
- जाहिरातीसाठी शुल्क आकारणार नाही.
- चारशे मोबाइल टॉयलेट उभारणार.
- पदपथ, रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणार
- स्मार्टसिटीचे जाहिरात फलक उत्सवाच्या काळात माहितीसाठी वापरणार
- शाळांच्या मैदानावर पार्किंगसाठी जागा
- सीसीटीव्हीसंदर्भात पोलिसांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करणार
- रस्त्यांची पाहणी तातडीने करण्यात येईल.