नवी दिल्ली – ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची नोंदणी करण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 24 दिवसात, एक कोटीहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली. यापैकी सुमारे 43% लाभार्थी महिला तर 57% पुरुष कामगार आहेत. महाराष्ट्रात एक ते तीन लाखादरम्यान नोंदणी झाली आहे.
बांधकाम क्षेत्र, तयार कपड्यांचे उत्पादन, मासेमारी, रोजंदारी करणारे मजूर आणि फलाटावर काम करणारे मजूर, रस्त्यावरील व्यवसाय, घरगुती काम, शेती आणि त्या संबंधित क्षेत्र, वाहतूक क्षेत्र इत्यादी विविध क्षेत्रांतील असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
देशात अंदाजे 38 कोटी असंघटित कामगार असून त्यांची नोंदणी करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे. स्थलांतरित कामगार देखील आता ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगार-आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.
या पोर्टलमध्ये स्वतःची नोंदणी करण्यासाठी कामगार सर्वसाधारण सेवा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र, पोस्टाच्या निवडक टपाल कार्यालयांना भेट देऊन या पोर्टलवर आपली नोंदणी करु शकतात. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, असंघटित कामगारांना डिजिटल ई-श्रम कार्ड व सर्वसमावेशक खाते क्रमांक मिळेल आणि त्यांना आता विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल.