खडकवासला – पुणे विधानभवन येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, माझा सिंहगड माझा अभिमान या अभियानांतर्गतसुरू करण्यात आलेल्या ई- बस सेवेला बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली होती. या मागणीला अजित पवार यांनी देखील उद्या १७ मेपासून बससेवा तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा तात्काळ निर्णय घेतला.
नवनाथ पारगे युवा मंच यांनी केलेल्या निवेदनानुसार गेल्या १५ दिवसांत या वाहतूक बसेसचे किरकोळ स्वरूपाचे ३ अपघात घडले आहेत. सध्या वाहतुकीसाठी असणाऱ्या बस गाड्यांचा आकार मोठा असून त्यामानाने किल्ल्याच्या घाट रस्त्यांची रुंदी मोजकीच असल्याने ही बससेवा तात्काळ स्थिगीत करण्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी मोहोर उमटवली.
पुणे विधानभवन येथे अजित पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नवनाथ पारगे यांनी लहान बसेस उपलब्ध कराव्यात किंवा रस्ता रुंदीकरण असे दोन्हीही पर्याय सुचवले आहेत. यावेळी भागातील हॉटेल व्यावसायिक तसेच खाजगी वाहतूक विभाग, वनाअधिकारी बाबासाहेब दिगंबर लटके डोणजेचे माजी उपसरपंच मारुती कंक, शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.