पुणे : अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सिंहगडावर सुरू करण्यात आलेली ई-बस सेवा शासकीय विभागांमधील समन्वय, ढिसाळ नियोजन आणि अनागोंदी निर्णयांमुळे अखेर स्थगित करण्याची वेळ पीएमपी प्रशासनावर ओढावली आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन आठवडयात झालेले चार अपघात, बससाठी चार्जिंग स्टेशनची सोय नसणे, अव्वाच्या-सव्वा तिकिट आणि छोटा घाट रस्ता असताना या मार्गावर सोडण्यात आलेल्या मोठया बसेस अशा कारणांमुळे या बससेवेला गेल्या पंधरा दिवसात कौतूकापेक्षा टिकाच सहन करावी लागली होती.
त्यामुळे पीएमपीने ही सेवा तत्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर ही सेवा प्रायोगिक तत्वार सुरू करण्यात आल्याचे स्पष्टीकरणही हा निर्णय घेताना पीएमपीएमएकडून देण्यात आले आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी आता पर्यंटकांना पुन्हा खासगी वाहणे वापरता येणार आहेत.
सेवा एक समस्या अनेक
पीएमपीकडून मोठा गाजावाजा करत ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ही सेवा सुरू करण्यापूर्वी कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे गेल्या पंधरा दिवसातील या बस सेवेवरून दिसून येत आहे. मुळात या मार्गावर ई- बस सुरू करायची होती त्यामुळे आधी पुरेशे चार्जिंग स्टेशन उभारणे आवश्यक होते. मात्र, अवघी चार चार्जिग स्टेशन उभारून पीएमपीने सगळयात मोठी चूक केली. त्यानंतर या मार्गावर 25 बसचे नियोजन करण्यात आले.
प्रत्यक्षात एका बसला चार्जिंग करण्यासाठी 4 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे सलग दोन शनिवार-रविवार गडावर हजारो प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत रहावे लागले. त्यानंतर रस्ता लहान असल्याने बसला वळता येत नव्हते तसेच चढावर प्रवाशांना खाली उतरावे लागत होते. या शिवाय, गडावर जाण्यासाठी वाहतूक सुविधा देणाऱ्या खासगी वाहनमालकांचाही या निर्णयाला विरोध होता. त्याची परिणीती अखेर दोन आठवड्यातच सेवा बंद करण्यावर झाली आहे.
या करणार उपाय योजना
या सेवेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्यानंतर पीएमपीकडून सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहेत. त्यात, लहान बसेस आणणे, बसेसच्या संख्येच्या तुलनेत चार्जिंग स्टेशन वाढविणे, घाट रस्त्यावरील वळणे तसेच काही भागातील रस्त्याचे तातडीनं रूंदीकरण करणे, प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करणे अशी कामे केली जाणार आहेत. मात्र, त्यासाठी नेमका किती कालावधी लागणार आहे. हे निश्चित नसल्याने ही सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.