खडकवासला –सारसबागेजवळ पीएमपी प्रशासन नवीन “टुरिस्ट डेपो’ साकारणार आहे. या डेपोतून थेट सिंहगडावर सात मीटर लांबीच्या गाड्या सोडल्या जातील. सध्या, ई-बस सेवेला विविध कारणातून स्थगिती देण्यात आली आहे. आता पुन्हा नव्याने या बस सुरू करताना थेट सारसबाग ते सिंहगड अशी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
सिंहगडावर जाण्यास पीएमपी प्रशासनाने गोळेवाडी-डोणजे पासून ई-बस सुरू केल्या होत्या. बसच्या आपुऱ्या संख्या व घाट रस्त्यातील वळणार बस वळताना होत असलेली अडचण यातून घडणारे अपघात, प्रवाशांना सुसज्ज बसथांबा नसणे आदी बाबींमुळे ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पुढे काही कालावधीत ई-बस सेवा सुविधा पूर्ण व सुरक्षित प्रवास देणार आहे. महापालिकेच्या सहाय्याने पीएमपी प्रशासन आता सात मीटर लांबीच्या 300 ई-बस घेणार आहे. या सर्व ई बस नव्या टुरिस्ट डेपोतून सुटतील. यातील काही बस सिंहगडावर सेवा देणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सिंहगडावर सुरू केलेल्या ई-बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सेवा पुरवताना काही समस्या आल्या, त्यात सुधारणा नक्की दिसेल. सारसबाग येथे नवीन टुरिस्ट डेपो साकारला जाणार असून नव्या सात मीटर लांबीच्या ई-बस सिंहगडावर सेवा पुरवतील. त्यामुळे ई-बसने थेट येथूनही प्रवाशांना सिंहगडावर जाता येईल.
– लक्ष्मीनारायण मिश्रा,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएल