ब्रुसेल्स – गेल्यावर्षभरात जगभरातील 45 पत्रकारांना आपले कर्तव्य बजावताना मृत्यू आला आहे. यातील बहुसंख्य पत्रकारांचा मृत्यू अफगाणिस्तानमध्ये वार्तांकन करत असताना झाला आहे, असे जगातील सर्वात मोठ्या पत्रकारांच्या संघटना “इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट’ने म्हटले आहे.
या संघटनेने अशा पत्रकारांची वेगळी नोंदणी करायला लागल्यापासून म्हणजे गेल्या 30 वर्षातील ही संख्या सर्वात कमी संख्या आहे. यापूर्वी 2020 मध्ये 65 पत्रकारांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला होता. भ्रष्टाचार, गुन्हे आणि सत्तेचा दुरुपयोग उघड करत असताना बहुसंख्य पत्रकारांचा मृत्यू होत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत असल्याचे “आयएफजे’ने म्हटले आहे.
ज्या 45 पत्रकारांचा गेल्यावर्षी मृत्यू झाला आहे, त्यांच्या मृत्यूमुळे आपल्याला पत्रकारांनी समाजाची सेवा करत असताना केलेल्या बलिदानाची आठवण करुन दिली जाते. त्यांचे आपल्यावर आणि इतर हजारो जणांवर ऋण आहे, असे “आयएफजे’चे सरचिटणीस अँथनी बेलांजर यांनी म्हटले आहे. न्यायासाठी अथक परिश्रम करणे हीच या पत्रकारांना खरी श्रद्धांजली असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षात अफगाणिस्तानमध्ये 33, मेक्सिकोमध्ये 8, भारतात 4 आणि पाकिस्तानात 3 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. 1991 पासून जगभरात 2,721 पत्रकार मारले गेल्याचे संघटनेने म्हटले आहे.