संयुक्त राष्ट्र – गाझामध्ये विना अडथळा आणि तात्काळ मदत साहित्याचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अखेर ठराव झाला आहे. या ठरावासाठी सारखे येत असलेले अडथळे दूर करण्यात सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना यश आले आहे. या ठरावामध्ये हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या सर्व नागरिकांची विशेषतः लहान मुलाच्या सुटकेचीही मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आलेला या ठरावाचा मसुदा माल्टाने तयार केला होता. ठरावाच्या बाजून 12 तर विरोधात एकाही देशाने मतदान केले नाही. मात्र रशिया, ब्रिटन आणि अमेरिका मतदानाच्यावेळी अनुपस्थित राहिले.
या ठरावातून गाझामध्ये तात्काळ आणि विनाअडथळा आंतरराष्ट्रीय मदत पोचवण्यासाठी युद्ध स्थगित करण्याची मागणी केली गेली आहे. तसेच मदत पुोचवण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याचीही मागणी केली गेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये असा ठराव करण्यासाठी यापूर्वी चार अपयशी प्रयत्न होऊन गेले आहेत. प्रत्येक देशाला आपल्या आत्मरक्षणाचा हक्क आहे, अशा अर्थाचा अमेरिकेने मांडलेला ठराव रशिया आणि चीनने नकाराधिकार वापरून फेटाळून लावला होता.
तर रशियाने मांडलेल्या मतांच्या बाजूने पुरेशी मते पडू शकली नव्हती. तर ब्राझीलने मांडलेला ठराव अमेरिकेने नकाराधिकार वापरून फेटाळून लावला होता. या ठरावामध्ये हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला गेला नव्हता, असे कारण अमेरिकेच्यावतीने नंतर देण्यात आले. काल मंजूर झालेल्या ठरावामध्ये हमासच्या हल्ल्याचा उल्लेख करून ही चूक दुरुस्त करण्यात आली.
तिघांची वेगवेगळी कारणे…
हमासच्या हल्ल्याचा निषेध नसल्यामुळे अमेरिकेने या ठरावाला विरोध केला नसला तरी मतदानाच्यावेळी अनुपस्थित राहण्याचा पर्याय स्वीकारला. हमासच्या हल्ल्याचा थेट शब्दात निषेध न केल्याबद्दल ब्रिटननेही ठरावाबद्दल नाराजी व्यक्त केली. तर या ठरावातून प्रदेशातील सर्वांच्या मदतीचे आवाहन केले गेले नसल्याची सबब देऊन रशियानेही मतदानामध्ये भाग गेतला नाही.