World Cup 2023 South Africa vs Australia 2nd Semi-Final : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
सध्या, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा विश्वचषक 2023 स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. सामना थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाच्या 14 षटकानंतर 4 बाद 44 धावा केल्या होत्या. सध्या हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत.
पावसामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता…
जरी सध्या ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत असली, तरी पाऊस ऑस्ट्रेलियासाठी अडचणी निर्माण करू शकतो. कारण…पावसामुळे आज सामना पूर्ण झाला नाही तर उद्या राखीव दिवस असून उद्या सामना पूर्ण होईल. जर उद्याही पाऊस पडला आणि सामना पूर्ण झाला नाही तर दक्षिण आफ्रिका थेट अंतिम फेरीत (Final) पोहोचेल कारण गुणतालिकेत त्यांची स्थिती ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक 2023 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेचा संघ 7 विजय आणि दोन पराभवानंतर 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर (Net Run Rate +1.261) राहिला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानंही साखळी फेरीत 7 विजय अन् दोन पराभवासह 14 गुण मिळवत(Net Run Rate +0.841) तिसरे स्थान मिळवलं.