प्रशांत जाधव
सातारा – करोनाच्या संकटामुळे गेली अनेक महिने एसटीची चाके कधी फिरली तर कधी थांबली होती. मात्र, या काळात एसटीच्या या वाहतुकीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने महामंडळाच्या सातारा विभागाला मोठा फटका बसला आहे. दररोज वीस लाखांचे नुकसान सहन करत एसटी विभागाला मार्च 2020 ते आजपर्यंत सुमारे 96 कोटींचा फटका बसला आहे. इतका मोठा फटका सहन करून सुरू असलेल्या एसटी महामंडळाला डिझेलचाही खर्च निघत नसल्याची परिस्थिती आहे.
करोनामुळे देशातील सगळ्याच उद्योगांना जसा फटका बसलायं तसाच सरकारीआस्थापनांनाही बसला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादेखील मोठ्या प्रमाणात करोनाची झळ बसल्याचे वास्तव आहे. संचारबंदी, जिल्हांतर्गत तसेच राज्यातील प्रवासाला बंदी असल्याने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली.
परिणामी गरिबांची लाल परी आज प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करताना दिसत आहे. साधारपणे फेब्रुवारी 2020 नंतर एसटीच्या प्रवासाला मर्यादा आल्या व त्यानंतर तो जवळपास बंदच झाला.
या काळात एसटी सातारा जिल्ह्यात प्रतिदिन धावणाऱ्या जवळपास 588 गाड्यांची चाके जाग्यावर रूतल्याने दररोजच्या दोन हजार फेऱ्या बंद कराव्या लागल्या. त्यामुळे दररोज 54 लाख 70 हजारांचे उत्पन्न असलेल्या एसटीला करोनाच्या फटक्याने आज डिझेलपुरते पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.
मार्च 2020 मधील परिस्थिती
बंद गाड्या 588,
रद्द फेऱ्या 2000
दररोज होणारे किलोमीटर- 2 लाख 4 हजार
दररोजचे उत्पन्न- 54 लाख 70 हजार
18 ऑगस्ट 2021 रोजी परिस्थिती
सुरू असलेल्या फेऱ्या- 628
सुरू असलेल्या गाड्या- 402
दररोज होणारे किलोमीटर- 1 लाख 33 हजार
दररोजचे उत्पन्न- 34 लाख 4 हजार 966 रूपये