ST Bus : ऐन दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाने भाडेवाढ केली आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एसटी महामंडळाने आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 8 नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही भाडेवाढीची झळ सहन करावी लागणार आहे. एसटी महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर भाडेवाढ जाहीर केल्याने नक्कीच याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
ही भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीटदराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांना त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे. दरम्यान, दिवाळी हंगामाचा फायदा उठविण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळ अशा प्रकारची भाडेवाढ करीत असते.
अशा प्रकारची भाडेवाढ करण्याची एसटीला मूभा देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही उन्हाळी अथवा दिवाळी सुट्यानिमित्त एसटी महामंडळाची अशा प्रकारचे दरवाढ करीत असते. एसटी महामंडळाने 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलत जाहीर केल्याने एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला याचा फायदा होत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही ठिकाणी एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला होता. मागील काही दिवसांत एसटीचे 20 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. मात्र आता बंद आगारातील एसटीची वाहतूक शुक्रवारी पूर्ववत झाली आहे. यामुळे दिवाळीत प्रवाशांना पुन्हा एकदा एसटीने प्रवास करणे शक्य होणार आहे.