नेवासा (प्रतिनिधी) – गेवराई (ता.नेवासा) येथील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी आलेल्या नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल संतोष खंडागळे हे किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.
सराईत गुन्हेगार सागर कर्डिले याच्यावर पोलीस कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सागर कर्डिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सागर कर्डिले याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्डिले हा फरार झालेला होता.
कर्डिले हा गावात आल़्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस ठाण्याचे पथक कर्डिले याला पकडण्यासाठी गेवराई येथे आले असता पोलीस पथकाच्या वाहनाला आरोपी सागर कर्डिले याने धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी पाठलाग करून गुन्हेगार सागर कर्डिलेच्या मुसक्या आवळल्या.. मात्र, यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल संतोष खंडागळे हे किरकोळ जखमी झाले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे करीत आहेत.
“कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही”
कायद्याच्या राज्यात समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करणे पोलिसांचे काम आहे. कोणी कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवत असेल तर अशा गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा पोलीस उगारणार असल्याचा गर्भित इशारा नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि.धनंजय जाधव यांनी दिला