पाचगणी -महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरला थंडी वाढली असून महाबळेश्वरमधील वेण्णा तलावाच्या परिसरातील पारा शून्यावर गेल्याने वेण्णा लेक व लिंगमळा येथे दवबिंदू गोठून हिमकण साचल्याचे दृश्य दिसत होते. महाबळेश्वरला वाढलेल्या थंडीमुळे हिमकण दुलईचा अनुभव पर्यटकांसह स्थानिकांनी घेतला.
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्री वेण्णालेक परिसरात पारा शुन्यावर असल्याचे तापमान मापकाने दर्शवले. महाबळेश्वर शहरात पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करुन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत.
वेण्णा लेक व लिंगमळा परिसरात शहरापेक्षा गारठा जास्त तीव्रतेने जाणवतो. वेण्णा लेक परिसरात बोटीवर व झाडांच्या पानावर हिमकण पाहयला मिळाले. यावर्षींच्या हंगामात प्रथमच हिमकण दिसले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढउतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचले होते.
ठिकठिकाणी दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे जेटी पांढरी झाली होती. हवामान खात्याच्या नोंदीनुसार आज महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 3 अंश सेल्सियस होते. तर वेण्णा तलाव परिसरात तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सियसपर्यंत घसरला. ठिकठिकाणी शेकोट्या करून नागरिक व पर्यटक शेकत बसले होते. हिमकण गोळा करण्याचा आनंद आज अनेक हौशीनी घेतला. थंडीचा जोर अजूनही कायम आहे.