पुणे : नगरसेवकाच्या सुचकतेतून… शुद्ध पाण्याची नासाडी टळली

पर्वती दर्शन झोपडपट्टीतील शौचालयांना कुपनलिकेद्वारे पाणीपुरवठा

– हर्षद कटारिया

सहकारनगर – महानगरपालिकेकडून प्रक्रिया करून शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा शहरासाठी केला जातो. परंतु, याच पाण्याचा वापर शहरातील 400 पेक्षा अधिक झोपडपट्टी परिसरात कपडे धुणे, भांडी धुणे आणि शौचालयांमध्ये वापरण्यासाठी केला जातो. यातून शुद्ध पाण्याची होणारी नासाडी थांबविण्यासाठी पर्वती दर्शन येथे पालिकेच्या निधीतून खोदण्यात आलेल्या कुपनलिकेचे (बोअर) पाणी सार्वजनिक शौचालयातील टाक्‍यांमध्ये साठवले जात असून याचा वापर केला जात आहे. यामुळे शुद्ध केलेल्या हजारो लिटर पाण्याची बचत होत आहे.

पर्वतीदर्शन येथील वसाहतीत भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक रघुनाथ गौडा यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबविला जात आहे. साधारण पाच हजार नागरिक कुपनलिकेच्या पाण्याचा वापर करत आहेत.

याबाबत स्वीकृत नगरसेवक गौडा म्हणाले की, करोना आजाराच्या काळात सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून पर्वती दर्शन वसाहतीमध्ये संसर्ग वाढत होता, यातून रुग्णांचे प्रमाण वाढले होते. यावर उपाय म्हणून दिवसातून तीनवेळा शौचालय स्वच्छ करण्यासाठीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत होती. पालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. परंतु, शौचालयाच्या वापरासाठी शुद्ध पाणी वापरणे चुकीचे ठरत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. 

पर्वती दर्शन परिसरात हा उपक्रम यशस्वी ठरत असून यातून हजारो लिटर शुद्ध पाण्याची बचत होत आहे. या पाण्याचा अन्यत्र पुरवठा करणे पालिकेला शक्‍य झाले आहे. शुद्ध पाण्याची इतक्‍या मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे पाहून सदर उपक्रम राबविल्याचे समाधान वाटते. वसाहतीमध्ये असलेली एक विहीर पुनर्जीवित करून त्याचे पाणी ही अशा पद्धतीने वापरण्याचा विचार आहे.

चमकोगिरी करणाऱ्यांनी…
कोट्यवधीचा निधी आणला…, असे सांगून चमकोगिरी करणाऱ्यांनी, असे जनहिताचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. शहरातील झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पर्वती दर्शन या ठिकाणी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अन्य ठिकाणी राबविल्यास शुद्ध पाण्याची बचत होईल. यातून यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवल्यास पसरणाऱ्या आजारांवरही नियंत्रण आणता येईल.

पुणे शहरात 561 झोपडपट्ट्या असून शहराच्या लोकसंख्येच्या साधारण 40 टक्के नागरिक झोपडपट्टी परिसरात राहतात. हा उपक्रम सर्वत्र राबविल्यास लाखो लिटर शुद्ध पाण्याची बचत होऊ शकेल.
– गणेश शेरला, सरचिटणीस पुणे शहर झोपडपट्टी आघाडी, भाजप


पर्वतीदर्शन वसाहती भागात कुपनलिका (बोरिंग) घेऊन त्याचे पाणी सार्वजनिक शौचालयास पुरविण्याच्या उपक्रमास यश मिळत आहे. या उपक्रमातून शुद्ध केलेल्या पाण्याचा अपव्यय टळत आहे. ही बाब स्वागतार्ह आहे.
– राजेंद्र खैरनार, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग


कुपनलिकेचे पाणी वापरताना भूजल पातळीवर होणाऱ्या परिणामावर लक्ष द्यावे. महत्वाचे म्हणजे ज्या जागी पाणी उपसले जाते त्या जागी पावसाळ्यात समतोल ठेवत पुन्हा पाणी रिचार्ज (मुरविण्यासाठी) कसे काम केले जाईल, याकडेही लक्ष द्यावे.
– अभिजित घोरपडे, पर्यावरण तज्ज्ञ 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.