आळेफाटा – पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानातून व स्व:खर्चातून अर्धा किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता झाल्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर झाली आहे.
पिंपरी पेंढार येथे असलेल्या ओढ्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती.
या रस्त्याच्या कामासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित होता. याबाबत सुखदेव कुटे, डॉ. पुरुषोत्तम बोऱ्हाडे, मंडलाधिकारी राजेश ठुबे, अशोक डेरे, राघव पोटे, कल्पेश कुटे, विमलेश गांधी, महेश कुटे, संकेत जोरी व अन्य सदस्यांनी युथ फाउंडेशनची स्थापना करुन त्या माध्यमातून अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम श्रमदानातून केले आहे. प्रांताधिकारी संजय पाटील यांनी या कामाची दखल घेऊन पिंपरी पेंढार गावाला भेट दिली व तरुणांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.