प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – पुणे स्थानकात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे काही ट्रेन्स शिवाजीनगर आणि पुणे स्थानकादरम्यान उभ्या राहिल्या होत्या, तर काही पुणे स्थानकात सुमारे दोन ते अडीच तास उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर वेळापत्रकही बिघडले.
पुणे स्थानकात शनिवारी सकाळी ओव्हरहेड इक्वीपमेंट (ओएचइ) ट्रीप झाल्याने सकाळी 7 ते 9 या वेळेत वीज ठप्प होती. त्यामुळे पाच ते सहा ट्रेन्सना सुमारे दोन तास उशीर झाला होता. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुटणारी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुणे स्थानकातून 9 वाजून 15 मिनिटांनी सुटली. यामुळे चाकरमान्यांना कामावर पोहचण्यासही दोन तास उशीर झाला होता. या घटनेमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, दुरन्तो एक्स्प्रेस आणि पुणे-लोणावळा लोकल ट्रेन या पुणे स्थानकातच उभ्या होत्या. तर सिंकदराबाद-मुंबई दुरन्तो एक्स्प्रेस, आणि तिरुचिरापल्ली-गंगापल्ली हमसफर एक्स्प्रेस या ट्रेन्स शिवाजीनगर आणि पुणे स्थानकादरम्यान उभ्या होत्या. या दोन्ही ट्रेन्स स्थानकावर न पोहचल्याने यातील प्रवाशांनी मध्येच उतरून रेल्वे रूळावरून चालत स्थानक गाठले आणि निश्चित स्थळी प्रवास केला.
“ओएचई’ ट्रीप झाल्याने अर्धा ते एक तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाड त्वरित दुरूस्त करून विद्युत पुरवठा पूर्ववत केला. पण, दरम्यानच्या काळात डीझेलवर चालणाऱ्या ट्रेन्स सुरू होत्या. – मनोज झंवर,
जनसंपर्क अधिकारी, पुणे
“मी मुंबईला जाण्यासाठी सकाळी रेल्वे स्थानकावर आली होती. त्यावेळी स्थानकातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती. रेल्वेचे नेहमीच गर्दीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित कसा होतो? – हर्षा शहा,
अध्यक्षा, रेल्वे प्रवासी मंच