दुष्काळी स्थितीत पशुखाद्यांच्या किमती भडकल्या; क्विंटलला पाचशे ते हजार रुपये वाढ

दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत 

नगर: जिल्ह्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळत असताना, पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्यांच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल 500 ते 1000 रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. पशुखाद्यांच्या किमती वाढल्या असताना दुधाच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पाणी व चाराटंचाई निर्माण झाली आहे. आता पशुखाद्याच्या कच्च्या मालाच्या किमतीत वर्षभरात दुपटीने वाढ झाली आहे. ही दरवाढ पशुपालकांना झेपणारी नाही. यामुळे दुधाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. येणाऱ्या खरीप हंगामापर्यंत या किमती अशाच राहण्याची शक्‍यता व्यावसायिक वर्तवित आहेत. गतवर्षी मक्‍याचा दर 1200 ते 1400 रुपये क्विंटल होता. यात वाढ होऊन यावर्षी दर प्रतिक्विंटल 2500 ते 3000 रुपये झाला आहे. सरकी 1700 रुपये क्विंटलवरून 3200 रुपये क्विंटलवर पोहोचली आहे. शेंग पेंडचे दर प्रतिक्विंटल 3000 रुपयांवरून 4000 रुपयांवर पोहोचले आहेत. गहू चुरी 1500 रुपये क्विंटलवरून 2200 रुपये क्विंटलवर पोहोचली. गुळी पेंडीचा दर 2800 रुपये क्विंटलवरुन 3000 रुपये झाला आहे. सुग्रास हा पौष्टिक आहार 1600 रुपयांवरून 2000 रुपये प्रतीक्विंटलवर पोहोचला आहे. पुढील काळात या किमती आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

दूध उत्पादनात घट
पशुखाद्यांचे सध्याचे दर पशुपालकांना परवडणारे नाहीत. या स्थितीत गोपालकांना जनावरांसाठी आहार पुरविणे अवघड झाले आहे. ओला चाराही उपलब्ध होत नाही. त्यामुळे दूध उत्पादनही घटले आहे. पशुखाद्यांच्या किमती वाढल्याने दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्‍यता दूध डेअरीचालक वर्तवित आहेत. मात्र काही दूध डेअरीचालकांनी वाढीव दराबाबत मौन पाळल्याचे दिसत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.