‘डीएसके’ गुंतवणूकदारांचा मतदानावर बहिष्कार?

वाट पाहून थकलेल्या गुंतवणूकदारांची कैफियत : राज्यकर्त्यांकडून केवळ आश्‍वासने

पुणे – डीएसके कंपन्यात गुंतवणूक करणाऱ्या हजारो गुंतवणूकदारांचा संयम आता ढळू लागला आहे. दर आठवड्याला हे गुंतवणूकदार चर्चा करून विविध नेत्यांना पत्राद्वारे आपली कैफियत मांडत आहेत. मात्र, यातून आतापर्यंत काहीच निष्पन्न न झाल्यामुळे हे गुंतवणूकदार सध्या प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत.

गुंतवणूकदाची रविवारी मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटीका येथे बैठक झाली. यावेळी शहराच्या विविध भागातून आलेले काही गुंतवणूकदार भावूक होऊन, तर, काही गुंतवणूकदार चिडून आपले गाऱ्हाणे मांडत होते. त्यांना शांत करताना संयोजकांना बराच प्रयत्न करावा लागत होता. या बैठकीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. यावेळी दीपक फडणीस, शरद नातू, महेश शिवरकर, सुधीर गोसावी, विजय कुंभार, विजया धुडके यांच्यासह सुमारे दोनशे गुंतवणूकदार उपस्थित होते. यातील काहींनी अशी माहिती दिली की, 10 ते 12 ज्येष्ठ नागरिक पैशाची वाट पाहून निधन पावले. त्याचबरोबर किमान 25 नागरिक वृध्दत्व आणि आजारामुळे या बैठकीला इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत. त्यातील काही गंभीर अवस्थेत असूनही, त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत.

यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री, स्थानिक आमदार, खासदारांशी संपर्क साधून पत्रव्यवहार केला तरी, पोहोच पावतीपेक्षा पुढे काही होत नाही, अशी खंत गुंतवणूकदारांनी व्यक्त केली. ही गुंतवणूकदारांची संख्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले नातेवाईक आणि हितचिंतक हजारो आहेत. हा प्रश्‍न सोडविण्याचे ठाम आश्‍वासन मिळाल्याशिवाय आम्ही मतदानात भाग घेणार नाही, असे मतांची मागणी करण्यास आलेल्या लोकप्रतिनिधींना बजावरणार असल्याचे या गुंतवणूकदारांनी सांगितले.

हे गुंतणूकदार शहरांच्या विविध भागात विखुरलेले आहेत. त्यामुळे त्यांना संघटीतपणे एकत्र येऊन हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्यास मर्यादा येत आहेत. ही बाब ध्यानात घेऊन, आता या गुंतवणूकदारांची एका सेवा भावी संस्था नोंदविण्याची प्रक्रीया सुरू आहे. पुढील आठवड्यात या संस्थेची नोंदणी करण्यात येणार आहे. याकरिता अनेक ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छा व्यक्त केली. या आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची जमवाजमव करण्याची प्रक्रीया जोरात सुरू आहे. यावेळी हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) कडे दाद मागण्याच्या शक्‍यतेवरही विचार करण्यात आला.

त्यावेळी धायरी येथून एक ज्येष्ठ गुंतवणूकदार सुरेश गंगाराम भातखंडे आले होते. त्यांना येताना प्रवासावेळी भयंकर त्रास झाला. मात्र, आगामी बैठकांना ते उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांचे जवळजवळ 3 लाख 80 हजार रुपये अडकेलेले आहेत. डीएसके कंपन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 12 ते 24 टक्के व्याजाने परतावा देण्यात येत होता. ते डिसेंबर 2016 पर्यंत गुंतवणूकदारांना ठेवी व्यवस्थित परत देत होते. जानेवारी 2017 नंतर पैसे देणे बंद झाले. गुंतवणूकदारांचे प्रत्यक्ष 1 हजार 153 कोटी रुपये अडकेले असल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.