पुणे(प्रतिनिधी) – बांधकाम व्यावसायिक डीएसके प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट सादर केला आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात हा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.
यामध्ये ठेवीदारांकडून तसेच त्यांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांचे काय केले? आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा झाला? पैशांची हेराफेरी कधी व कशी झाली? त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले? याची इतंभूत माहिती देण्यत आली आहे.
हा रिपोर्ट एक हजार पानांचा आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस किंवा वकील तज्ज्ञ असतातच असे नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांची कुंडली काढण्यासाठी सरकारी मान्यता असलेल्या सीए फर्मची नियुक्ती केली जाते.
ही फर्म निष्पक्षपणे गुन्ह्यातील कंपनीचे ऑडिट करते. ठेवीदारांची फसवणूक कशी झाली हे त्याआधारे समजते. त्यामुळे फर्मने सादर केलेला अहवाल हा महत्त्वाचा पुरावा असतो.