बॅंकॉक :- म्यानमारमधील लष्करी शासनाने तब्बल 446 दशलक्ष डॉलर किंमतीचे अमली पदार्थ जाळून नष्ट केले आहेत. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. म्यानमारच्या आजूबाजूच्या प्रदेशांमधून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
म्यानमारमध्ये अफू, हेरोईन आणि मेथाम्पेटामाईनचे उत्पादन वाढले आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले होते. म्यानमारमधून या अमली पदार्थांची निर्यात दक्षिण आशियामध्ये आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात आला होता. म्हणून म्यानमारच्या लष्करी शासनाने हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
यान्गोन शहरामध्ये 207 दशलक्ष डॉलरचे अमली पदार्थ आणि रसायने जाळून नष्ट केली गेली. यामध्ये अफू, हेरोईन, मेथाम्फेटामाईन, मारिजुआना, क्राटोम, केटोमाईन आणि क्रिस्टल मेथ सारख्या अमली पदार्थांचा समावेश होता.
तर पूर्वेकडील शान प्रांताची राजधानी तौंग्गयी आणि मंडाले या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जाळून नष्ट केले गेले. गेल्या वर्षीही 642 दशलक्ष डॉलरचे अमली पदार्थ जाळून नष्ट केले गेले होते.
राजकीय- आर्थिक असुरक्षिततेमुळे अफूच्या लागवडीकडे कल…
म्यानमारमधील सततच्या सशस्त्र संघर्षामुळे तेथे नेहमीच राजकीय आणि आर्थिक असुरक्षिततेचे वातावरण असते. त्यामुळेच तेथे अमली पदार्थांच्या उत्पादनावर नियंत्रण राहिलेले नाही. मेथाम्फेटामाईनचे मोठे उत्पादन म्यानमारमध्ये होते. तर अफगाणिस्तानच्या खालोखाल अफू आणि हेरोईनचे सर्वाधिक उत्पादन म्यानमारमध्ये घेतले जाते.
स्थानिक शेतकऱ्यांना अन्य पीक घेण्यासाठी वारंवार प्रोत्साहन दिले गेले आहे. मात्र अधिक नफ्याच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांकडून अफूची लागवड प्राधान्याने केली जाते.
2020 मध्ये अफूचे उत्पादन 400 मेट्रिक टन होते, 2021 मध्ये ते किंचित वाढले आणि नंतर 2022 मध्ये अंदाजे 790 मेट्रिक टनांपर्यंत वाढले असल्याची माहिती मिळते आहे. या अमली पदार्थांच्या व्यापाराचा फायदा काही बंडखोर गट सरकारविरोधातल्या लढ्यासाठी करत असल्याचेही बोलले जाते आहे.