Drone Didi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांचे कौतुक केले. यातच त्यांनी उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथील रहिवासी सुनीता देवी यांच्याशी संवाद साधला. त्यांची ‘ड्रोन दीदी’ म्हणून खास ओळख आहे. सध्या आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. हातांऐवजी ड्रोनने शेतात कीटकनाशकांची फवारणी करण्यावर अनेकजण भर देत आहेत.
ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेतीत कशी मदत करू शकते हे जाणून घेण्यासाठी पीएम मोदींनी ड्रोन दीदींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. चला तर मग या ड्रोन दीदी कोण आहेत? आणि त्यांची कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात.
कोण आहे ड्रोन दिदी ?
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात राहणाऱ्या सुनीता देवी ‘ड्रोन दीदी’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ड्रोनद्वारे शेतात फवारणी करतात. आजूबाजूचे अनेक शेतकरी त्यांच्या शेतात फवारणीसाठी त्यांची मदत घेतात. त्या शेतकरी कुटुंबातील आहे. सुनीता यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मात्र त्यांनी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून तिने देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती, सासू आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे.
कोठून प्रशिक्षण घेतले ?
ड्रोन दीदी यांनी अलाहाबाद येथील फुलपूर इफको कंपनीत ड्रोनचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सीतापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात ड्रोन पाहिला होता. प्रशिक्षण त्यांना ड्रोनच्या पार्ट्सपासून ते त्याच्या वापरापर्यंत सर्व काही समजावून सांगण्यात आले. त्यानंतर ड्रोन कसे उडवायचे हे प्रॅक्टिकल झाले. सुरुवातीला त्या ड्रोन घेऊन त्यांच्या शेतात पोहोचल्या तेव्हा तिथे लोकांची गर्दी झाली होती. काहींनी त्याची खिल्लीही उडवली, पण आता वेळ आणि पीक वाचवण्यासाठी ते ड्रोनची मदत घेतात. तसेच लोक आता त्यांचं कौतुकही करत आहेत.
शेतात ड्रोनचा कसा होतो फायदा?
पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात जाण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत ड्रोनचा खूप उपयोग होऊ शकतो. आम्ही शेताच्या टोकावर उभे राहून आमच्या ड्रोनने काम पूर्ण करू शकतो. ड्रोन शेतात घुसून कीटक काढू शकतो. शेतीवर लक्ष ठेवता येईल. ड्रोनच्या मदतीने शेतात खत टाकणेही सोपे झाले आहे. तिने सांगितले की, आतापर्यंत त्यांनी 35 एकर शेतात ड्रोनच्या मदतीने फवारणी केली आहे. यावेळी सुनीता देवी यांनी ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांचा वेळही वाचतो. कारण केवळ अर्ध्या तासात ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केली जाते, असा त्यामागचा फायदा त्यांनी सांगितला.