नागपूर – महाराष्ट्रातील मंदिरांवरुन सध्या अनेक वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झालेला. त्यातच आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक घोषणा केली आहे. नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, अशी मागणीही महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300हून अधिक मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही महासंघाने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. मंदिरात अंगप्रदर्शन होणार नाही, असभ्य, अशोभनीय व तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी नियम लागू करण्यात आला आहे, अशा अनेक मागण्या यापूर्वीही महासंघाने केल्या आहेत. राज्य सरकारची देखील सरकारी कार्यालयांसाठी वस्त्र संहिता आहे. मग मंदिरासाठी का नको? असा सवाल देखील या वेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू?
गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप शिव मंदीर.
“देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. येणाऱ्या काळात सर्व मंदिरात ती लागू व्हावी. जर कोणी मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येतील. भाविकांना त्याचा वापर करून मंदीरात प्रवेश करता येईल. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम असतील.”
– सुनील घनवट, महाराष्ट्र मंदीर महासंघ