पुणे – बालगंधर्व रंगमंदिराची स्वच्छता आणि परिसराच्या सुरक्षिततेसाठी आता नाट निर्माते, व्यावसायिक तसेच कलाकारांना नवीन नियमावली लागू केली आहे. यात रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणतीही वाहने नाट्यगृहांच्या आत अथवा बाहेर घेऊन जाण्यासाठी परवानगी असणार नाही. याशिवाय, रंगमंदिराच्या आवारात व बेसमेंटमध्ये धुम्रपान तसेच मद्यपानास मनाई करण्यात आली असून स्टेज परिसरात कलाकार अथवा नाटसंस्थेचे कर्मचारी गुटखा, पान खाऊन थुंकताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.
महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्राचे प्रशासन अधिकारी सुनील मते यांनी याबाबतच्या सूचना सर्व नाट्य निर्माते तसेच व्यवस्थापकांना दिल्या आहेत. नाट्यगृह परिसरात बेकायदेशीर पार्किंग तसेच अनावश्यक बाबींमुळे नाट्यगृहाची सुरक्षा तसेच परिसरात समस्या वाढल्या आहेत. तसेच अस्वच्छता आणि गैरप्रकाराच्या तक्रारीही येत असल्याने हे नवीन नियम घातल्याचे सांगण्यात येत आहे.
असे आहेत नवीन नियम…
– रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणासही वाहने आत अथवा बाहेर जाण्यासाठी गेट उघडले जाणार नाही.
– बेसमेंटमधून नाटक साहित्य घेऊन जाण्यासाठी अथवा ठेवण्यासाठी आतमध्ये एकच तास वाहन ठेवता येईल.
– रंगमंदिरातील सेवक अथवा सुरक्षारक्षकांशी रात्री दार उघडण्यासाठी हुज्जत घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– रंगमंदिर आवार व बेसमेंटमध्ये धुम्रपान व मद्यपानास मनाई.
– रंगमंदिराच्या आवारात फ्लेक्स अथवा बोर्ड लावता येणार नाही.
– संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी अथवा कलाकार स्टेजच्या परिसरात थुंकल्यास त्यांच्यावर कारवाई होणार.
– प्रयोग ठरवून दिलेल्या वेळेतच संपविणे आवश्यक असेल.
– बेसमेंटमध्ये ठरवून दिलेल्या गाळ्यातच नाटक साहित्य ठेवावे, बेसमेंटमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास मनाई.