पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेने त्याच्या वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सादर केलेला परवानगी अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विधीला हजर राहता येईल, अशी सूचना न्यायालयाने केली. या प्रकरणी दि. 6 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) सीआरपीसीच्या कलम 294 नुसार, खटल्याशी संबंधित कागदपत्रांची यादी सादर केली. त्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूची कारणे, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपी संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो आदी तेरा कागदपत्रांचा समावेश आहे.
सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले, तर आरोपींच्या वतीने ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी बाजू मांडली.
या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे मान्य आहेत, हे बचाव पक्षातर्फे पुढील सुनावणीत सांगितले जाणार आहे. त्यानंतर सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) सादर केली जाणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी
या सुनावणीला आरोपी डॉ. तावडे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे औरंगाबादमधील हर्सूल मध्यवर्ती कारागृहातून स्थलांतरित केलेला आरोपी सचिन अंदुरे हे दोघे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून, तर आरोपी शरद कळसकर मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. जामिनावर असलेले आरोपी ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे प्रत्यक्ष हजर होते. आरोपी कळसकर याला ताबडतोब येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने आर्थर रोड कारागृह प्रशासनाला दिले.