पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळवली आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारासाठी डॉ. भटकर यांची निवड केली आहे. तसेच यावेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरवण्यात येणार आहे.
पुरस्कराचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. सलग ३५ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबवला. यंदा या पुरस्काराची रक्कम एक लाख रूपयांवरून वाढवून दोन लाख रूपये करण्यात आली आहे.
या रकमेच्या थैलीसह सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिकृती, या नगरीच्या ग्रामदैवतांसह वैशिष्ट्यपूर्ण असे पुण्यभूषण स्मृतीचिन्हात हे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रदान करण्यात येईल.