पुणे – नील मुळ्ये व आनंदिता लुनावत यांनी शानदार विजय मिळविला आणि डॉक्टर प्रमोद मुळ्ये चषक जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे 19 वर्षाखालील मुले व मुली या गटात अजिंक्यपद पटकाविले. पीवायसी जिमखाना तर्फे व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा पीवायसी जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.
मुलांच्या गटात नील याने अनपेक्षित विजयाची मालिका कायम ठेवीत अंतिम फेरीत ईशान खांडेकर याला पराभूत केले. पाचवे मानांकन मिळालेल्या नील याने रोमहर्षक लढतीत 11-9,11-13,11-7, 12-10, 11-8 असा विजय मिळविला. या मोसमात जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक स्पर्धा गाजविणाऱ्या नील याला त्याचे वडील उपेंद्र यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. नील हा रेडियंट अकादमीचा खेळाडू असून तो कावेरी महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे.
मुलींच्या अंतिम फेरीत आनंदिता हिला राधिका सकपाळ हिच्या विरुद्ध विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. हा सामना तिने 11-8,11-4,11-9, 10-12,11-9 असा जिंकताना अप्रतिम खेळ केला. ती सूर्यदत्ता महाविद्यालयात शिकत असून तिला भूषण सिंग ठाकूर या माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटूंचे मार्गदर्शन मिळत आहे.