पिंपरी – दरवर्षी दहीहंडीसाठी शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये मराठी-हिंदी अभिनेते आणि अभिनेत्रींना आमंत्रित केले जाते. या सिनेतारकांमुळे दहीहंडीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासाठी मोठी रक्कम खर्चली जाते. परंतु यावर्षी निवडणुकीचा अद्याप पत्ता नसल्याने राजकीय मंडळींना हात आखडता घेतला आहे. यामुळे अनेक मंडळांनी सेलिब्रिटींना आमंत्रित केले नाही. तसेच दरवर्षीप्रमाणे सोशल मीडियावरील जाहिरातबाजी यंदा दिसत नाही. चौका-चौकात लागणारे भव्य होर्डिंग, फ्लेक्सयंदा दिसत नाहीत.
ओबीसी आरक्षण, प्रभाग तीनचा की चारचा याबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे जात आहे. यामुळे महापालिकेची निवडणूक गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे. महापालिकेची निवडणूक कधी होईल, हे स्पष्ट होत नसल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी थाटलेली आपली जनसंपर्क कार्यालये देखील बंद केली आहेत. त्यामुळेच दरवषी मोठ्या उत्साहात आणि मराठी आणि हिंदी सिनेतारकांच्या उपस्थितीत साजरा होणारा दहीहंडीचा उत्साह शहरात दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
शहरातील दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसह काही राजकीय नेतेमंडळी आपल्या परिसरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करतात. मात्र, गतवर्षी महापालिका निवडणूक होण्याची शक्यता होती. त्यामुळे दहीहंडीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षाच्या इच्छुकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी शहरभर फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. सिनेतारकांची उपस्थिती, दहीहंडी पथकांवर देण्यात येणारी लाखो रूपयांची बक्षिसे, रोषणाईवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यंदा मात्र, पालिकेची निवडणूक होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने काही ठराविक भागातच दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे.
वर्गणीसाठी आखडता हात
दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना भरीव आर्थिक सहाय्य करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेतेमंडळी आणि आगामी निवडणुकीसाठी इच्छुक नेहमीच आघाडीवर असतात. मात्र, 13 मार्च 2022 रोजी महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. गेल्या दीड वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. इच्छुक पालिकेची निवडणूक कधी होणार? याकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून विविध कार्यक्रम, वर्गणी देऊन इच्छुकांचा खिसा रिकामा होण्याची वेळ आल्याने दहीहंडी आणि गणेशोत्सवाला वर्गणी देण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे.
शहरातील काही भागातच दहीहंडीची तयारी
गेल्या काही वर्षांत पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, चिखली, मोशी, सांगवी भागांतील मंडळ आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असतो. यंदा पिंपरी, चिंचवड, मोशी भागातच दंहीहंडीची तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदी व मराठी कलाकारांना दहीहंडीसाठी आमंत्रित केले आहे. गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, दहीहंडी फोडण्याची पथकांमधील वाढणारी चुरस, गाण्यांच्या स्वरात थिरकणारे सिने तारका, तरुण असे वातावरण यावर्षी काही प्रमाणात कमी दिसणार आहे.