कार्ला, दि. 6 (वार्ताहर) – एकवीरा देवस्थानचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरच विधिमंडळात लवकरच एक बैठक घेऊ. या बैठकीसाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात येईल, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित “बये दार उघड मोहीमेचा’ समारोप कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनाने करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, एकवीरा देवीच्या मंदिरातील कळस चोरी झाल्याच्या प्रश्नावर मी पाठपुरावा केला होता. पुढील वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी, हि इच्छा आहे. याबाबत. उच्च न्यायालयाने आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने योग्य ती कार्यवाही होण्यासाठी लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी त्यांनी केली. तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्तरावर या परिसरातील जमिनींचा ताबा घेतल्याचे प्रश्न प्रलंबित आहे. यावर लवकरच बैठक घेणार आहे.
यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, युवासेना पदाधिकारी शीतल शेठ, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, स्थानिक शिवसेना पदाधिकारी मच्छिंद्र खराडे, सुरेश गायकवाड, अनिता गोणते, शैला खंडागळे, वेहेरगावच्या सरपंच अर्चना देवकर, पुणे महिला आघाडीच्या कल्पना थोरवे, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, ज्योती चांदेरे, अमृत पठारे, स्वाती रणपिसे, सुनिता रानवडे, रुपाली सुतार, पिंपरी चिंचवड येथील वैशाली मराठे, अनिता तुतारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.