किवळे, दि. 6 (वार्ताहर)-मावळ तालुक्यामध्ये जनावरांच्या लम्पी आजारा आजाराला प्रतिबंध घालण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे. तालुक्यात जवळपास शंभर टक्के लम्पी लसीकरण झाले असून, अद्यापही लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील पशूपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मावळ तालुक्यात एकूण 28 हजार 826 जनावरे आहेत. त्यापैकी 28 हजार 615 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात 29 ऑगस्टपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. याकरिता एकूण 26 पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले. यासाठी सहा पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये डॉ. अनिल परंडवाल, डॉ. नितीन मगर, डॉ. रुपाली दडके, डॉ. सतीश भोसले, डॉ. अजय सुपे, डॉ. बाळासाहेब वाघमोडे, डॉ. विलास काळे, परिचर अंकुश नागरगोजे आदींचा समावेश होता.
सुरूवातीला जनावरांचा मृथ्यूहोऊ लागल्याने, जनावरांचा बाजार भरविण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली. त्यामुळे या आजाराचे गांभीर्य पशुपालकांना जाणवले. त्यानंतर पशूधन वाचविण्यासाठी लस उपयुक्त असल्याचे समजताच गावागावातून लसींना मागणी वाढली होती. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने गावागावात जाऊन, गोठ्यातील जनावरांचे लसीकरण केल्याने या मोहिमेने जनावरांचा जीवाचा धोका टळला. दरम्यान, पशुविकास अधिकाऱ्यांची कमतरता असल्याची बाब समजताच राज्य सरकारनेदेखील पशुसंवर्धन विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती संकलीत करून, लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अनेक अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने देखलि नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यामध्ये लम्पी आजाराची 214 जनावरांना बाधा झाली होती. त्यातील 18 जनावरे दगावली, तर 124 जनावरांनी लम्पीमुक्त झाली. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु असून ही सर्व जनावरे लवकरच लम्पीमुक्त होतील. अजूनही काही जनावरांचे लसीकरण करणे राहिले असल्यास त्यांनी 9890990658 या क्रमांकावर संपर्क साधावा. -डॉ. दीपक राक्षे, पर्यवेक्षक,पशूधन पर्यवेक्षक.
मावळ तालुक्यात पशुवैद्यकीय विभागाने लसीकरणाचा वेग वाढविल्याने अगदी दुर्गम भागातील जनावरांनादेखील याचा फायदा झाला. तालुक्यातील गावोगावी, दुर्गम भागात पोहोचून पशुधनाचे लसीकरण पूर्ण केले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पशुधन वाचविण्यात यश आले आहे. त्यामुळे तालुक्यातील पशूपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. -विशाल दांगट, उपतालुका अधिकारी, युवासेना मावळ.