जपानी भाषेला शिक्षणातून प्रोत्साहन
पुणे – भारतात जपानी भाषेला शिक्षणाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्याबद्दल जपान सरकारकडून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
जपान आणि अन्य देशांमधील आणि क्षेत्रामधील मैत्रीच्या प्रचारातील योगदान अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या व्यक्ती आणि गटांना दरवर्षी जपान सरकारकडून सन्मानित केले जाते. 2020 या वर्षासाठी जगभरातील जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रशंसा प्राप्त केलेल्या 122 जणांच्या यादीत डॉ. टिळक आणि पुरी येथील भारत-जपान मैत्री केंद्राचे अध्यक्ष कुन्ना दास यांचा समावेश आहे.
मुंबई येथील जपानचे वाणिज्य दूत म्हणाले, डॉ. दीपक टिळक यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून विद्यापीठात जपानी भाषा सुरू करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या पुढाकाराने सन 2008 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठात जपानी भाषा विभाग आणि सन 2011 मध्ये जपानी भाषा “मास्टर प्रोग्राम’ सुरू झाला.
जागतिक विद्यार्थ्यांसह देवाण-घेवाण कार्यक्रमांना डॉ. टिळक यांनी प्रोत्साहन दिले. आता, टिमविची भारतातील जपानी भाषा शिक्षणामध्ये मुख्य भूमिका आहे.