आता मात्र हद्द झाली : एकाच रुग्णाला डबल व्हेरियंटची लागण

गुवाहाटी – देशभरात कोरोना कहर गेल्या दीड वर्षभरापासून सुरू असून कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचा फैलाव देखील सुरू असून या व्हेरिएंटने देखील अनेक जण बाधित झाले आहेत. नुकतीच आसाममधील एका महिला डॉक्‍टरला एकाच वेळी कोरोना व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळले आहे.

ही देशातील अशी पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बी बोरकाकोटी यांनी ही माहिती दिली.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्‍टरांना कोरोना व्हेरिएंटच्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे आढळले. आरएमआरसीच्या प्रयोगशाळेत मे महिन्यात रुग्णांवर कोरोनाचा डबल ऍटक झाल्याचे आढळले होते. डॉ. बोरकाकोटी यांनी असे सांगितले की, ब्रिटन, ब्राझील आणि पोर्तुगाल येथे देखील दोन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याची काही रूग्णांची नोंद केली गेली होती, परंतु भारतातील ही पहिलीच घटना असून यापूर्वी असा प्रकार कधीच घडलेला नाही.

या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एक महिनानंतर तिला आणि तिच्या पतीला कोरोना व्हायरसच्या अल्फा व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाला. हे दोघेही डॉक्‍टर आहेत आणि कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना दरम्यान त्यांनी अनेकांना सेवा दिली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांनी सांगितले की, आम्ही या जोडप्याचे नमुने गोळा केले आणि चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात महिला डॉक्‍टरला दोन व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले.

या महिला डॉक्‍टरला घसा खवखवणे, शरीरास वेदना होणं आणि झोप न येण्यासारखी लक्षणं तिला जाणवत होती. मात्र तिला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्‍यकता भासली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.