विवेकानंद काटमोरे
हडपसर – मेगासेंटर येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक तीन कार्यालयासाठी अधिकारीच उपलब्ध नसल्याने गेल्या काही महिन्यापासून सह दुय्यम निबंधक हवेली तीन कार्यालय बंद आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या दस्त नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि वकीलांची गैरसोय होत आहे.कार्यालयात अधिकारी नसताना आता हे कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने वरिष्ठांकडून विचार सुरू आहेत.अशी चर्चा येथील वकील आणि नागरिकांमध्ये सुरू आहे.
मेगासेंटर येथील हे कार्यालय नेहेमीच या-ना त्या कारणाने बंद असते. त्यात गेली दिवसांपासून पुन्हा हे कार्यालय बंद आहे. त्यामुळे येथे खरेदी खत, साठेखत, कुलमुख्त्यार पत्र, बक्षीस पत्र, मृत्यू पत्र आदींसह इतर दस्त नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या पंचक्रोशीतील नागरिक आणि वकिलांची गैरसोय होत आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक तीन बंद असल्याने कोंढवा येथील सह दुय्यम निबंधक हवेली कमांक १२ आणि कदमवाकवस्ती लोणी काळभोर येथील सह दुय्यम निबंधक हवेली कमांक ६ मध्ये नागरिक दस्त नोंदणीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे या कार्यालयावरही ताण निर्माण होत आहे. त्यामुळे मेगासेंटर येथील हवेली क्रमांक तीन कार्यालय सध्या आहे त्याच ठिकाणी तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
मेगासेंटर येथील हवेली तीन हे नोंदणी कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. येथे सक्षम व पूर्ण वेळ अधिकारी द्यावा तसेच येथील कार्यालय इतरत्र कोठेही स्थलांतरित करू नये, असा संमिश्र प्रतिक्रिया हडपसर परिसरातील काही वकिलांनी व्यक्त केल्या आहेत.
हवेली क्रमांक 3 येथील बंद असलेले नोंदणी कार्यालय, येथे दुय्यम निबंधक अधिकारी नाहीत. तसेच कार्यालय स्थलांतरित करण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत सह जिल्हा निबंधक प्रकाश खोमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
1) मेगा सेंटर येथील हवेली क्रमांक तीन सह दुय्यम निबंधक कार्यालय हे जर दुसरीकडे स्थलांतरित झाले. तर ,अनेक वकिलांचे तसेच झेरॉक्स दुकानदारांचे ,हॉटेल चालकांचे अतोनात असे नुकसान होईल . अनेक लोक बेरोजगार होतील . त्यामुळे हे ऑफिस आहे तिथेच राहणे जास्त योग्य राहील. त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी की जो सदर ऑफिस अत्यंत व्यवस्थितपणे हाताळू शकेल व सगळ्यांवरती आपला कंट्रोल ठेवू शकेल.
ॲड. करण तुपे
2) हडपसर मेघा सेंटर येथील हवेली ३ हे कार्यालय नागरिकांसाठी सोईचे असून मध्यवर्ती ठिकाणी आहे. ते कार्यालय तेथेच चालु व्हावे. शासनास ते दुसरीकडे स्थलांतरीत केल्यास नागरिकांची गैरसोय होईल. स्थलांतरीत केल्यास प्रशस्त ठिकाणी स्थलांतरीत करुन ते कार्यालय सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ असे दोन वेळेत चालू करावे. त्यामुळे नागरिक व वकील यांना त्यांचे वेळेचे नियोजन करुन दस्त नोंदणी जलद, सुलभ आणि सुखकर होण्यास मदत होईल.
ॲड.चेतन शेवाळे
3 ) सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली नंबर 3 हे ज्या- ज्या वेळी बंद पडले त्यावेळची पार्श्वभूमी पाहता सदर कार्यालयामध्ये निबंधक म्हणून ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी चार्ज घेतला त्यांनी अनाधिकृत आणि बेकायदेशीर दस्त सुरू केले. त्यामुळे प्रचंड गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर सदर कार्यालय बंद पडले. निव्वळ वकिलांना दोष देऊन काही उपयोग होणार नाही. त्यासाठी हुशार आणि रजिस्ट्रेशन ऍक्ट ,महसूली कायद्याचा अभ्यास असणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे आहे.
ॲड. वैभवराव धायगुडे पाटील
4) पूर्व दिशेच्या १०० ते १५० गावांमधील लाखों नागरिकांच्या सोयीसाठी २० ते २५ वर्षांपासून हवेली क्रमांक तीन हे कार्यालय येथे सुरू आहे. हे कार्यालय कोणत्याही वकिलांच्या,एजंटांच्या, मध्यस्थ आणि शासकीय अधिकारी यांच्या सोयीसाठी नसून हडपसर परिसरातील लाखों पक्षकारांचे व नागरिकांचे काम होण्यासाठी आहे.जर कार्यालय स्थलांतर करायचे असेल तर ते शासकीय जागेत करून तेथे पूर्ण वेळ म्हणजे किमान तीन वर्षे स्वच्छ, पारदर्शक व निष्कलंक सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी.
ॲड. अशपाक पठाण
5) स्थालांतरित झाले तरी हडपसर परिसरात जवळपास व तळमजला असावा आणि कायमस्वरूपी सब रजिस्टार नेमवा.जेणेकरून वकील वर्ग व लोकांची गळचेपी होणार नाही.तात्पुरत्या स्वरूपात सब रजिस्टर नको. सतत बदलले गेले की सिस्टीम सतत बदलत रहाते व काम करणे अवघड होते.तिथे गाडी पार्किंग चा देखिल विचार करावा.
ॲड.गिरीष वेदपाठक
6) हडपसर मध्ये वास्तविक पाहता २ ते ३ दुय्यम निबंधक कार्यालयाची आवश्यकता असताना सुद्धा हडपसर मधील मेगा सेंटर मधील दुय्यम निबंधक कार्यलय खूप दिवसापासून बंद आहे .त्यामुळे हडपसर मधील महिला तसेच जेष्ट नागरिकांना दस्त नोंदणीसाठी हडपसर च्या बाहेर पुण्यात किंवा लोणी येथे १० कि मी बाहेर जावे लागते .आणखी त्यात बंद असलेले हडपसर मधील दुय्यम निबंधक कार्यालय हे चालू न करता दुसरीकडे स्थलांतरीत होत असेल तर हडपसर मधील मुद्रांक शुल्क आणि कर भरणा-या नागरीकावर अन्याय केल्यासारखे होईल. तरी प्रशासनाने सदरील कार्यालय स्थलांतर न करता पुन्हा चालू करावे.
ॲड.अलोक गायकवाड
7)बरेच दिवसापासून हवेली 3 येथील कामकाज बंद आहे. त्यामुळे हडपसर भागातील वकील वर्ग महिला वकीलामध्ये खूप नाराजी आहे. तसेच नागरिकांना दस्त नोंदणीसाठी बाहेरच्या हवेली मध्ये जावे लागत आहे .त्यामुळे वेळ ,पैसे आणि सर्वांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे . हवेली 3 आत्ता आहे त्या ठिकाणी असणे सर्वांच्या दृष्टीने हिताचे आहे .त्यामुळे हवेली आहे त्याच ठिकाणी राहणे गरजेचे आणि सोयीचे आहे.त्यामुळे वकील वर्ग पुणे बार असोसिएशन अध्यक्ष आणि अधिकारी साहेब यांनी समन्वय साधून विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
ॲड.माधुरी देसाई
8) हडपसर येथील लोकसंख्या जवळपास 5 ते 6 लाख आहे. हडपसर येथे मोठमोठे व्यवसायिक बिल्डर आहेत.त्यांचे होणारे दस्त याचे प्रमाण जास्त आहे. तसेच बँकां,पतसंस्थेचे प्रमाण जास्त आहे .अशी परिस्थिती असताना हवेली नंबर 3 हे ऑफिस स्थलांतरित करणे योग्य नाही. त्याचबरोबर याआधी हवेली 3 व हवेली 6 हे ऑफिस हडपसर येथे होते. हवेली नंबर 6 हे ऑफिस 4 वर्षांपूर्वी कदमवाकवस्ती लोणी काळभोर येथे स्थलांतरित केले आहे .मग जर हडपसर येथे एवढी लोकसंख्या व दस्त नोंदणी अधिक होत असताना एकही ऑफिस हड़पसर ला नाही तर कारभार चालणार कसा ?
ॲड.अमोल कापरे
9) मेगासेंटर मधील हवेली 3 हे दस्त नोंदणीसाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनसाठी अत्यंत सोईचे ठिकाण असून येथे पार्किंगची देखील उत्तम व्यवस्था आहे. हवेली 3 जर स्थलांतरित झाले तर नागरिकांचे नाहक हाल होतील. तरी नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासन सदर स्थलांतर थांबवेल व बंद असलेले कार्यालय लवकरात लवकर सुरू करेल अशी अपेक्षा आहे.
ॲड.अमोल भोरडे