बीजिंग – अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी जर तैवानला पोहोचल्या तर त्याची किमत अमेरिकेला चुकवावी लागेल. चीनची सार्वभौमता आणि सुरक्षा मूल्ये यांनी कमी लेखण्याचे मूल्य त्यांना चुकवावे अशा शब्दांत चीनने अमेरिकेला धमकी दिली आहे.
चीन काय करू शकतो?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर पेलोसी तैवानला गेल्याच तर चीन आपला रोष तैवानवर व्यक्त करू शकतो. त्यानुसार चीनची लढाऊ विमाने हवाई हद्दीचा भंग करत तैवानवर घिरट्या घालण्याचा प्रकार पुन्हा एकदा करतील. तसेच तैवानने या विमानांवर हल्ला करावा यासाठी त्यांना चिथावणी देण्याचाही प्रयत्न करतील.
तैवानला धाकात घेण्यासाठी तैवानजवळ समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी सुध्दा घेतली जाण्याची शक्यता आहे. 1995 मध्ये अमेरिका आणि तैवानच्या कथित जवळीकीला इशारा देण्यासाठी असा प्रकार चीनने केला होता. चीन तैवानचा सगळ्यांत मोठा व्यापारी भागिदार आहे.
त्यामुळे तैवानला धडा शिकवण्यासाठी चीनकडून त्या देशावर आर्थिक निर्बंधही लादले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
चीन तैवानच्या एखाद्या लहान बेटावर बेकायदा कब्जा करण्याचीही शक्यता आहे. शीतयुध्दाच्या काळात चीनच्या लष्कराने असेच तैवानच्या किनमॅन बेटावर बॉम्बहल्ले केले होते.