नवी दिल्ली – आपले चुलते आणि बंडखोर खासदार पशुपती पारस यांना मंत्रीपद दिले जाउ नये. पारस यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले, तर आपण न्यायालयात जाऊ असा इशारा लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी दिला आहे.
आपण पक्षाचे अध्यक्ष असून पक्षातून हकालपट्टी केलेल्या उमेदवाराला मंत्रीपद देणे योग्य नसल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
चिराग पासवान यांच्या अपरोक्ष पक्षातील सहापैकी पाच खासदारांना एकत्र करत पशुपती पारस यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. बिहार विधानसभेपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला होता. त्याला आव्हान देत पुन्हा पक्षाला एनडीएसोबत घेऊन जाण्याचा निर्णय पारस यांनी जाहीर केला होता. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पारस यांच्या हकालपट्टीची घोषणा केली होती.
पक्षातून हाकलून दिलेल्या नेत्याला मोदी मंत्रिमंडळात सहभागी करून घेणार नाहीत, असा विश्वासही चिराग पासवान यांनी व्यक्त केला आहे. मात्र तसे घडलेच, तर कायदेशीर लढाईसाठी आपण सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपले वडिल रामविलास पासवान यांच्या विचारांशी दगा करून पक्षात फूट पाडणाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचे चिराग यांनी स्पष्ट केले आहे. याची कल्पना निवडणूक आयोगालाही देण्यात आल्याचे ते म्हणाले. पशुपती पारस यांना जेडीयुत प्रवेश द्या आणि मग त्यांना मंत्री करा, पण लोकजनशक्ती पक्षाच्या नावाने त्यांना मंत्री करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले आहे.