कोलकाता – प. बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या खेला होबे या घोषणेने निवडणुकीची चित्र बदलले होते. भाजपकडे जनतेचा कल असल्याचे वातावरण तयार झाले असताना मतदारांनी भाजपला नाकारल्याचे नंतर सिध्द झाले.
त्यात या घोषणेचाच मोठा वाटा होता. घोषणा लोकांनी स्विकारल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खेला होबे दिवस साजरा करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. निवडणुकीच्या सभांमध्ये टीएमसी आणि विशेषत: ममता बॅनर्जी यांनी वारंवार हा नारा दिला होता. त्याचे लक्ष्य थेट भाजपकडे होते. या निवडणुकीच्या घोषणेने टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.
टीएमसीची निवडणूक घोषणा केवळ खेला होबे नव्हे तर यासह ममता बॅनर्जी यांनी दिलेलेली आणखी एक घोषणा होती, खेला होबे, देखा होबे, जेता होबे म्हणजे खेळा, पहा आणि जिंकू. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी जय श्री राम च्या घोषणेला उत्तर म्हणून हरे कृष्णा हरे राम, विदा हो बीजेपी-वाम अशी घोषणा दिली होती.