भूलथापांना बळी पडू नका

विम्यांसाठी अधिकृत कंपन्या आणि एजंटकडे संपर्क साधावा


फसवणुकीच्या तक्रारीनंतर विमा नियंत्रकांचे आवाहन

हैदराबाद – काही फसवेगिरी करणारे आणि अनधिकृत लोक जनतेशी संपर्क साधून विमा पॉलिसी देण्याच्या नावाखाली गैरव्यवहार करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनीही सावध राहून या संदर्भातील व्यवहार थेट कंपनी किंवा कंपनीच्या अधिकृत एजंटच्या माध्यमातूनच करावा, असे आवाहन विमा नियंत्रकांनी केले आहे.

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ऑफ इंडिया संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामान्य नागरिक आणि पॉलिसी धारकांनी आपले व्यवहार थेट कंपन्या किंवा अधिकृत एजंटद्वारा करावे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लोक विमा कंपन्यांच्या नावाने नागरिकांशी संपर्क साधून फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फसवणूक करणारे लोक विमा नियंत्रकांबरोबरच रिझर्व्ह बॅंक, इन्शुरन्स ट्रान्झेक्‍शन डिपार्टमेंट अशा प्रकारचे नाव घेऊन नागरिकांशी किंवा पॉलिसी धारकांशी संपर्क साधत आहेत. पॉलीसीधारकांना व नागरिकांना या संदर्भातील काही आमिषे दाखवून त्यांच्याकडून रक्‍कम उकळण्याचा प्रकार घडल्याच्या तक्रारी आहेत.

त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. विमा नियंत्रक विमा कंपन्यांच्या कामकाजावर लक्ष देतात. नियंत्रकाच्या वतीने कसलीही पॉलिसी विकली जात नाही किंवा कसलाही व्यवहार केला जात नाही. मात्र, नियंत्रकाचे नाव घेऊन काही जण गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले आहे. असा प्रकार झाल्यानंतर नागरिकांनी या आमिषाला बळी पडू नये. यासंबंधातील माहिती विमा नियंत्रकांना कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

खात्री करूनच व्यवहार करावेत
एखाद्या व्यक्‍तीने विम्यासंदर्भात फोन केला असेल तर तो खरोखरच एखाद्या विमा कंपनीचा कर्मचारी आहे किंवा एजंट आहे याची नागरिकांनी खात्री करावी. त्यासाठी विमा कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन आवश्‍यक ती माहिती मिळवावी. पूर्ण खात्री झाल्याशिवाय अशा नागरिकांशी कसलाही व्यवहार करू नये. त्याचबरोबर ज्यांच्याशी व्यवहार केला त्यांची माहिती जवळ ठेवावी, असे विमा नियंत्रकांनी नागरिकांना उद्देशून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.