मंचर, (प्रतिनिधी) – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी चाळीस वर्षांनी एकत्र येत तत्कालीन शालेय जीवनातील गमती जमती व आठवणींना उजाळा दिला. शाळेसाठी ५१ हजार रुपयाची देणगी दिली. विद्या विकास मंदिरच्या १९८२-८३ या शैक्षणिक वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय स्नेहसंमेलन आयोजित केले होते.
या कार्यक्रमासाठी तीन महिने तयारी करण्यात आली. ४० वर्षांनंतर प्रथमच काही मित्र भेटणार म्हणून प्रकाश टाव्हरे, दीपक कराळे, शत्रुघ्न जाधव, गुलाब हिंगे, मालीनी पिंपळे यांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून प्रत्येक मित्रमैत्रिणींबरोबर संपर्क करून ५८ मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार केला, चर्चा करण्यात आली, स्नेहसंमेलनासाठी ४५ मित्र मैत्रिणी एकत्र आले.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश शिंगाडे यांनी हॉल मिळवून दिला. सर्व मित्रमैत्रिणींनी वर्गणी जमा करून शाळेसाठी ५१ हजार रुपयाची देणगी दिली. दीपक कराळे यांनी प्रास्ताविक केले. प्रत्येकाने ४० वर्षांतील सुखद अनुभव सांगत आपापले मनोगत व्यक्त केले. अधून मधून शेर-शायरी गाणी,भेंड्या विनोद सांगून मनोरंजन करत कार्यक्रमास सदानंद भगत यांच्यासह ईतर मित्र-मैत्रिणींनी रंगत आणली. अर्जुन हिंगे यांनी आभार मानले.