शिर्डी – येथील श्री रामनवमी उत्सवात सुमारे 2 लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन विविध मार्गाने एकूण 04 कोटी 9 लाख 39 हजार 627 रुपयांची देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले, श्री रामनवमी उत्सव काळात साईभक्तांकडून साईबाबा संस्थानला विविध माध्यमातून भरभरून देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये दानपेटीतून 1 कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये, देणगी काउंटरद्वारे 76 लाख 18 हजार 143, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डीडी, मनिऑर्डर आदींद्वारे 1 कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपये देणगी रक्कम स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने 171.150 ग्रॅम (8 लाख 64 हजार 723 रुपये) व चांदी 2713 ग्रॅम (1 लाख 21 हजार 813 रुपये) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध मार्गाने एकूण 4 कोटी 9 लाख 39 हजार 627 रुपये देणगी प्राप्त झाली आहे.
या व्यतिरिक्त उत्सवकाळात सशुल्क व ऑनलाइन पासेसद्वारे एकूण 61 लाख 43 हजार 800 रुपये देणगी प्राप्त झाली. तसेच श्री साई प्रसादालयात उत्सवकाळात 1 लाख 85 हजार 413 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. 32 हजार 530 साईभक्तांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. याबरोबरच 32 हजार 500 तीन नगाचे लाडू पाकीटे व 3 लाख 39 हजार 590 एक नग लाडू पाकिटांची विक्री करण्यात आली असून, याद्वारे 42 लाख 8 हजार 400 रुपये प्राप्त झाले आहे. 1 लाख 16 हजार मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे दर्शनरांगेतून साईभक्तांना वाटप करण्यात आले.
उत्सव कालावधीत साईआश्रम भक्तनिवास, द्वारावती भक्तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईबाबा भक्त निवासस्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवासस्थानांद्वारे 43 हजार 424 भक्तांची निवासाची व्यवस्था केली. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात 5 हजार 954 भक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली, अशी एकूण 49 हजार 378भक्तांची निवास व्यवस्था करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.