Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कारण ट्रम्प यांनी चक्क कोर्टात सुनावणीदरम्यान न्यायाधीशांच्या दिशेने हात उगारल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. यासोबतच सुनावणीवेळी वकिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मॅनहॅटन कोर्टात मानहानीच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यांचे वकील न्यायालयात उलटतपासणी घेत असताना ट्रम्प वारंवार अडवणूक करत होते. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश लुईस कॅप्लान यांनी ट्रम्प यांना बोलण्यापासून रोखले, मात्र तरीही ट्रम्प यांनी बोलणे सुरूच ठेवले. ट्रम्प यांच्या या वागण्याने न्यायाधीश कॅप्लान संतापले. त्याने ट्रम्प यांना कोर्टातून हाकलून देण्याची धमकी दिली. ट्रम्प संतापले आणि त्यांनी न्यायाधीशांच्या दिशेने हात वर केला.
ट्रम्प यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात ट्रम्प बराच काळ न्यायालयात हजर होत नव्हते. सुनावणीदरम्यान, तक्रारदार ई. जीन कॅरोल यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात साक्ष दिल्यामुळे तिची प्रतिष्ठा खराब झाली आहे आणि अनेक धमकीचे संदेशही पाठवले आहेत.
दरम्यान, या सुनावणीदरम्यान जेव्हा न्यायाधीशांनी ट्रम्प यांना बोलण्यापासून थांबवले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि न्यायाधीशांनी त्यांना हाकलून देऊ असे सांगितल्यावर ट्रम्प म्हणाले की, तसे केल्यास मला ‘बरे’ वाटेल. यानंतर ट्रम्प यांनी कोर्टातून बाहेर येताच न्यायाधीशांवर निशाणा साधत न्यायाधीशांना द्वेषपूर्ण आणि वाईट वृत्तीचे म्हटले.