पिंपरी – एकीकडे करोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला. दोन महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने 115 डॉक्टर, नर्स, आया, मावशी यांनी संप करत वैद्यकीय सेवा बंद केली. काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा पुन्हा सुरू केली असली तरी ऐन करोना रुग्णवाढीच्या काळात रुग्णसेवेचा खेळखंडोबा होताना दिसून आला.
महापालिकेने करोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत डॉक्टर, स्टाफनर्स यांना मानधनावर घेतले होते. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी ठेकेदार नेमले. त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास सुरुवात केली. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने 115 लोक काम करत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेटा ऑपरेटर, आया, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना संबंधित ठेकेदाराने वेतन दिले नसल्याने आज येथील कर्मचाऱ्यांनी संपाचा बडगा उगारला. या रुग्णालयामध्ये किती रुग्ण उपचार घेत आहेत याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आम्ही 1 ऑक्टोबरपासून काम करत आहोत. गेल्या दोन महिन्यांचा पगार आम्हाला मिळाला नाही. याबाबत आम्ही संस्थेच्या माणसांकडे विचारणा केली तर आम्हाला काहीच उत्तर दिले जात नाही. तर महापालिकेमध्ये विचारणा केली तर संबंधित एजन्सी तुमचा पगार देईल. महापालिकेचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आम्ही कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
“आम्हाला नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा पगार मिळाला नाही. करोनाच्या संकटामध्ये आम्ही सेवा करत आहोत. आता जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटून गेले तरी दोन महिन्यांचा पगार झाला नाही. एजन्सीवाल्यांनी सकाळी एक तासाचा वेळ मागितल्याने आम्ही काम सुरू केले आहे. मात्र आम्हाला आमचा पगार न मिळाल्यास आम्ही काम थांबवू.”
– एक कर्मचारी.
“ठेकेदाराची नियुक्ती करताना आपण ते कर्मचाऱ्यांचे पगार करू शकतील की नाही यासाठी त्यांच्या कंपनीची अर्थिक उलाढाल तपासत असतो. ज्यावेळी करार होतो त्यामध्ये संबंधित ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पगार करण्याबाबत नियम घालून दिलेले असतात. मात्र, जिजामाता रुग्णालयाच्या बाबतीत नेमके ठेकेदाराकडून काय झाले आहे याची चौकशी करतो. जर ठेकेदाराकडून काही चूक अथवा जाणूबूजून उशीर केला जात असेल तर त्यांना नोटीस काढली जाईल.”
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त.