अमरावती : अचलपूर येथील फिनले मिलमध्ये मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. असंख्य कामगारांची उपजीविका मिलवर अवलंबून आहे. ही मिल सुरु करण्यात यावी तसेच कामगारांचे थकित वेतन त्यांना देण्यात यावे. कामगार विभागाने त्यांच्या स्तरावर प्रस्ताव तयार करुन वस्त्रोद्योग विभागाकडे तात्काळ सादर करावा. मिलमधील सूत तयार करणारा विभाग व सूत विणून वस्त्र तयार करणारा विभाग प्राधान्याने सुरु करण्यात यावे यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश कामगार, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
फिनले मिल सुरू करण्याबाबत व कामगारांच्या थकित वेतन प्रदान करण्याच्या विषयावर बैठक विश्राम भवनातील कक्षात आयोजित करण्यात आली. बैठकीला सहायक कामगार आयुक्त प्रशांत महाले, जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक उदय पुरी, उपव्यवस्थापक गिरीश सांगळे, शासकीय कामगार अधिकारी राहुल काळे, धर्मेंद्र पिंपलेवार, फिनले मिलचे महाव्यवस्थापक अमित कुमार सिंग, कारखाना प्रबंधक संदीप कुमार विश्वास आदी उपस्थित होते.
कोरोना कालावधीत एप्रिल 2021 पासून मिल बंद आहे. कामगारांना 50 टक्के वेतन मिलच्या व्यवस्थापनाकडून प्रदान करण्यात येत आहे. परंतु मिल बंद असलेल्या काळातील पूर्ण वेतन कामगारांना प्रदान करण्यात यावे यासाठी मिलच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या आस्थापनेला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री कडू यांनी दिले.
कामगारांना कामगार कल्याण योजनेअंतर्गत योजना व सोयी सवलतींचा लाभ द्यावा
विकास प्रक्रियेत कामगारांचे अमूल्य योगदान असते. त्यांना आवश्यक त्या सोयी सवलतीचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी मिलच्या आस्थापनेने आवश्यक ते प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश मंत्री कडू यांनी यावेळी दिले. कायम कामगार, बदली कामगार व इतर कर्मचारी मिळून 827 कामगार या मिल मध्ये कार्यरत आहेत. कामगारांना मिळणाऱ्या सोयी सवलती अंतर्गत उपहारगृह, वैद्यकीय सेवा, अपघात विमा, कामगारांना किमान वेतनाप्रमाणे बँकेमार्फत वेतन तसेच कामगार कल्याण निधी योजनेचा लाभ वेळोवेळी देण्यात यावा, अशा सुचना संबंधितांना यावेळी दिल्या.