गरीबांचा विचार करून लाॅकडाऊन संदर्भात डाॅक्टरांच्या फोरमचे सरकारला आवाहन; दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली – देशात गरीबांना अडचणीच्या होतील अशा लॉकडाऊन सारख्या उपाययोजना करू नयेत असे आवाहन डॉक्‍टर आणि वैज्ञानिकांच्या एका फोरमने केंद्र सरकारला केले आहे.

देशात करोना वाढतो आहे हे खरे आहे पण त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजून आरोग्य सेवांमध्ये चांगल्या सुधारणा करणे गरजेचे आहे. रूग्णालये, बेड्‌स, आणि जागतिक मानांकनानुसार मनुष्यबळाची उपाययोजना वाढवून लोकांना अधिक दर्जेदार सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे असे या फोरमने म्हटले आहे.

देशात निवडणुकीच्या निमीत्ताने मोठ्या रॅली आयोजित केल्या जात असून अन्यही गर्दी करणारे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आणि त्याच वेळेला लॉकडाऊनचाही इशारा दिला जात आहे हे सारे परस्पर विरोधी आहे असेही या फोरमने म्हटले आहे. त्यातून लोकांचा गोंधळ वाढत चालला आहे. उपाययोजनांमधील गांभीर्य यातून हरवले जात आहे अशी खंतही या फोरमने व्यक्त केली आहे.

करोनाविषयक साऱ्या उपाययोजना आणि लसीकरण पुर्ण वैज्ञानिक तत्वांच्याच आधारे झाले पाहिजे असे मतही या फोरमने व्यक्त केले आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी सेवा रद्द करून नियमीत कर्मचारी तेथे भरले गेले पाहिजेत.

आरोग्य सेवांचे खासगीकरणही तातडीने थांबवण्याची गरज या फोरमच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन सारख्या उपाययोजनांना वैज्ञानिक आधार नाही आणि अशा उपाययोजनांचा गरीबानांचा मोठा फटका बसतो आहे त्यामुळे असले अघोरी उपाय योजू नयेत असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.