पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये चार वर्षांपूर्वी मानधनावर रुजू करण्यात आलेले डॉक्टर कायमस्वरूपी सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. या डॉक्टरांची मानधनावरील सेवा येत्या चार महिन्यांत संपुष्टात येणार असून, प्रशासनाकडून कायमस्वरूपी पदांसाठीची निवड प्रक्रिया देखील पूर्ण झाली असताना हा विषय विधी समितीमध्ये अडवून ठेवण्यात आला आहे. या चालढकलपणामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. दरम्यान ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण झाल्यास 103 डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ महापालिकेला कायमस्वरुपी उपलब्ध होणार आहे.
वायसीएममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. वारंवार याबाबत लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी विचारणा, तक्रारी केल्यानंतर डॉक्टर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी 28 ऑक्टोबर 2017 मध्ये मानधन तत्त्वावर डॉक्टर रुजू करून घेण्यात आले. ऑक्टोबर 2020 मध्ये ही मुदत संपणार आहे. सध्या हे सर्व डॉक्टर करोना आपत्तीत “कोविड योद्धा’ म्हणून कामगिरी पार पाडत आहेत. दरम्यानच्या काळात 7 डिसेंबर 2019 मध्ये महापालिका रुग्णालयात आवश्यक असलेल्या 103 तज्ज्ञ डॉक्टरांच्या कायमस्वरूपी नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
यामध्ये चार वर्षांपूर्वी मानधन तत्त्वावर रुजू करून घेण्यात आलेल्या डॉक्टरांना प्राधान्य देण्यात आले. निवड प्रक्रिया, मुलाखती व इतर सोपस्कार पूर्ण करण्यात आले. यामध्ये वायसीएममध्ये कार्यरत असणाऱ्या 36 डॉक्टरांची निवड करण्यात आली आहे. तर काही डॉक्टरांची प्रतीक्षा यादी देखील तयार आहे. हा विषय विधी समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी वेळकाढू धोरण राबविले जात असल्यामुळे डॉक्टर अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता पडण्याची शक्यता
प्रशासकीय स्तरावरील प्रक्रिया पूर्ण होऊन आता विधी समितीकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. विधी समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या नियुक्त्यांसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन, त्यावर राज्य शासनाचा अभिप्राय घ्यावा लागणार आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेसाठी पुन्हा मोठा कालावधी लागणार आहे. आधीच उशीर झालेल्या निवड प्रक्रिया पुन्हा लांबल्याने डॉक्टरांचे मनोधैर्य खचले आहे. पालिकेची चालढकल आणि सध्याचे आपत्कालीन वातावरण यामध्ये हे डॉक्टर वेगळ्या निर्णयाच्या मनस्थितीत आहेत. या सर्व डॉक्टरांना खासगी हॉस्पिटल, बाहेरील देशांमधून चांगल्या संधी आहेत. पालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या मनमानी कारभारात या डॉक्टरांनी बाहेरील संधी स्वीकारल्यास “वायसीएम’ हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता पडण्याची शक्यता आहे.
विधीचा कारभार संशयास्पद
करोनाबाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणारे महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका, तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफने गेले 75 दिवस कुठलीही सुट्टी न घेता स्वत:ला या लढाईत झोकून दिले आहे. शहरातील तब्बल 80 हजार नागरिकांची तपासणी आणि उपचार या काळात करण्यात आले आहेत. यातील बहुतांश डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून त्यांना काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेने त्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लालफितीत अडकली आहे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण ही तातडीची बाब असल्याचे माहिती असूनही ही प्रक्रिया विधीमध्ये प्रस्ताव पडून राहिल्याने विधीच्या कारभाराविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कायमस्वरूपी डॉक्टर भरतीबाबत प्रशासनाने निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. निवड आणि प्रतीक्षा यादी विधी समितीसमोर आहे. विधी समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर सर्वसाधारण सभा त्याबाबत निर्णय घेईल.
– मनोज लोणकर, सहायक आयुक्त, प्रशासन