भोपाळ – मध्यप्रदेशात काही वर्षांपूर्वी प्रचंड खळबळ उडवून देणारा व्यापमं घोटाळा उघड करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद राय यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश सरकारने राय यांना सेवेतून निलंबित केले.
मागील महिन्यात मध्यप्रदेश शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपावरून वादंग निर्माण झाले. त्या पेपरफुटीला मुख्यमंत्री सचिवालयात रूजू असणारे वरिष्ठ अधिकारी लक्ष्मणसिंह मरकाम जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यामागे राय असल्याचा आरोप करत मरकाम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी राय यांना अटक केली. ते सध्या मध्यप्रदेशच्या इंदूरमधील रूग्णालयात कार्यरत आहेत. त्या राज्यातील व्यापमं घोटाळा 2011 मध्ये उघडकीस आणण्यात राय यांनी महत्वाची भूमिका निभावली. तो प्रचंड घोटाळा सरकारी भरती प्रक्रियेशी संबंधित होता.
मध्यप्रदेशच्या व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) वतीने भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यावेळी करण्यात आले. मंडळाच्या नावावरून ते प्रकरण व्यापमं घोटाळा म्हणून ओळखले जाते. त्या घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये सीबीआयकडे सोपवला.