मुंबई – रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर वाढविले नाहीत. त्यामुळे शेअर बाजारात बरीच खरेदी होऊ तीन दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकांत भरीव वाढ झाली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक शुक्रवारी वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 412 अंकांनी वाढून 59,447 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकांनी वाढून 14,784 अंकावर बंद झाला. मोठ्या कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.93 टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर स्मॉल कॅपमध्ये 0.99 टक्क्यांची वाढ नोंदली गेली.
आयएचसी कॅपिटल नावाची संस्था अदानी समूहातील कंपन्यामध्ये 15,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर अदानीे समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावांत शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या बैठकीचे इतिवृत्त काल जाहीर झाले. यामध्ये आक्रमक व्याजदर वाढ करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
असे असले तरी आज आज सकाळी युरोप आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र आता शेअर बाजार निर्देशांक बऱ्याच उच्च पातळीवर असल्यामुळे आगामी काळामध्ये गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की गेल्या तीन दिवसापासून गुंतवणूकदार सावध होते. मात्र आज बरीच खरेदी झाली. आता गुंतवणूकदारांचे लक्ष विविध कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे लागणार आहे. पुढील आठवड्यापासून कंपन्या आपले ताळेबंद जाहीर करणार आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 5,009 कटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. फेडरल रिझर्व्हचे इतिवृत्त जाहीर झाल्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे.