मुंबई – दुबईत एक अनोख्या प्रकारातील महिलांची क्रिकेट लीग होणार आहे. येत्या 1 मे पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून जगभरातील महिला क्रिकेटपटू यात सहभागी होत असून याच कालावधीत महिलांची वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्यामुळे भारताच्या महिला क्रिकेटपटूंना या लीगमध्ये सहभागी होण्यास बीसीसीआयने परवानगी नाकारली आहे.
या वेगळ्या रचनेच्या लीगमध्ये तब्बल 35 देशांतील महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. फ्रेंचायझी लीग असे नामकरण करण्यात आलेली ही स्पर्धा दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. लैंगिक समानतेसाठी सातत्याने पुढार घेत असलेल्या एका संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा होमार आहे.
स्पर्धेचे 19 सामने 15 दिवसात खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा भारतीय महिला संघातील स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज व दीप्ति शर्मा यांच्यासह अन्य काही खेळाडूंनी सहभागी होण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, वरिष्ठ महिला राष्ट्रीय टी-20 स्पर्धा याच कालावधीत होत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे.
म्हणून स्पर्धा दुबईतच…
या स्पर्धेचे तांत्रीक यजमानपद हॉंगकॉंगकडे देण्यात आले होते. मात्र, करोनाच्या नियमावलीमुले ही स्पर्धा गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेप्रमाणे अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेण्यात आला व आता ही स्पर्धा दुबईतच होणार आहे. या स्पर्धेसाटी एकूण 90 खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले असून यातील 40 खेळाडू हे आयसीसीच्या संपूर्ण सदस्य असलेल्या देशांचे आहेत.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुन लुस, वेस्टइंडीजची अष्टपैलू डिएंड्रा डॉटिन व न्यूझीलंडची स्टार खेळाडू सुजी बेट्स या प्रख्यात महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्व सहभागी खेळाडूंना एकूण सहा संघात विभागण्यात येणार असून स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहिर केले जाणार असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.